कोरोनातून सावरलेल्या बालकांना ‘एमएसआय-सी’ आजाराचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:28 AM2021-06-25T04:28:50+5:302021-06-25T04:28:50+5:30
कोरोनाच्या पहिल्या लाटेत शून्य ते १५ वर्षे वयोगटातील ६०५ बालकांना संसर्गाची बाधा झाली; तर दुसऱ्या लाटेत ही संख्या १७८७ ...
कोरोनाच्या पहिल्या लाटेत शून्य ते १५ वर्षे वयोगटातील ६०५ बालकांना संसर्गाची बाधा झाली; तर दुसऱ्या लाटेत ही संख्या १७८७ वर पोहोचली. त्यातील केवळ एका बालकाचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. दरम्यान, कोरोनातून बरे झालेल्या बालकांना आता ‘एमएसआय-सी’ आजाराचा धोका लागून आहे. यामुळे ताप येणे, मुलांचे डोळे लाल होणे, त्वचेवर सुरकुत्या पडणे, मळमळ व उलट्या होणे, मुलांच्या पोटात सतत दुखत राहणे यासारखी लक्षणे दिसून येतात. मात्र, सुदैवाने वाशिम जिल्ह्यात कोरोनाच्या दोन्ही लाटेत बाधित आढळलेल्या २३९२ बालकांपैकी कोणालाही ‘एमएसआय-सी’ आजार जडल्याचे ऐकिवात नाही.
.......................
कोरोनाचे एकूण रुग्ण - ४१३०८
कोरोनावर मात केलेले रुग्ण - ४०३९१
जिल्ह्यात एकूण कोरोना मृत्यू - ६१५
उपचार घेत असलेले रुग्ण - ३०१
....................
जिल्ह्यात २३९२ बालकांना कोरोना
कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यातील ६०५, तर दुसऱ्या लाटेत १७८७ अशा एकंदरीत २३९२ बालकांना संसर्गाची बाधा झाली. त्यातील केवळ एकाचा मृत्यू झाला, तर इतर २३९१ बालक ठणठणीत बरे झाले आहेत. त्यांच्यापैकी कोणालाही कोरोनानंतर कुठलाही इतर गंभीर स्वरूपातील आजार जडलेला नाही.
.................
ही घ्या काळजी
१) कोरोनातून बरे झालेल्या मुलांना तोंडाला ‘मास्क’ लावल्याशिवाय घराबाहेर पडू देऊ नका. खूप ताप आल्यास आणि तो लवकर नियंत्रणात येत नसल्यास मुलांना तात्काळ डाॅक्टरांकडे नेऊन उपचार घ्यावे.
२) ‘मल्टी सिस्टिम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम’मध्ये मुलांचे डोळे लाल होणे, त्वचेवर सुरकुत्या पडणे, मळमळ आणि उलट्या होणे, सतत पोटात दुखणे आदी प्रकारची लक्षणे आढळतात. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या मुलांना अशा प्रकारचा कुठलाही त्रास होत असल्यास विनाविलंब उपचार घेणे अधिक सोईस्कर असल्याचे बालरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
.........................
कोट :
जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या दोन्ही लाटांमध्ये सुमारे २४०० बालक बाधित असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, सुदैवाने त्यापैकी एकालाही अद्यापपर्यंत ‘मल्टी सिस्टिम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम’ जडल्याचे आढळलेले नाही. असे असले तरी सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यक आहे.
- डाॅ. मधुकर राठोड
जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम