रिसोड बाजार समिती संचालक पदावरून तेजराव वानखेडे पायउतार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 06:12 PM2019-06-10T18:12:46+5:302019-06-10T18:13:20+5:30
पोलीस पाटील या शासकीय पदावर कार्यरत असल्याने तेजराव वानखेडे हे बाजार समितीवर सदस्य म्हणून राहण्यास अपात्र आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) : पोलीस पाटील पदावर कार्यरत असताना रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पद भूषविता येत नाही, असे स्पष्ट करीत पणन संचालकांनी तेजराव वानखेडे यांना बाजार समितीचे संचालक पदावरून कमी करण्यात येत असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ३० मे रोजी दिला, अशी माहिती संचालक घनश्याम मापारी यांनी १० जून रोजी दिली. यासंदर्भात घनश्याम भीमराव मापारी यांनी पणन संचालकांकडे तक्रार केली होती.
सन २०१५ साली रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली. ग्राम पंचायत मतदारसंघातून अर्जदार घनश्याम मापारी हे निवडून आलेले आहेत. गैरअर्जदार तेजराव जनार्धन वानखेडे हे सुद्धा २०१५ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून निवडून आले. तेजराव वानखेडे यांच्याकडे कुकसा या गावाचे पोलीस पाटील पद आहे. त्यामुळे ते बाजार समितीवर सभासद म्हणून राहण्यास अपात्र असून, त्यांना अपात्र घोषित करण्यात यावे यासंदर्भात मापारी यांनी अॅड. व्ही.बी. हेरोळे यांच्यामार्फत पणन संचालकांकडे अर्ज सादर केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर पणन संचालक डॉ. किशोर तोष्णिवाल यांनी वानखेडे यांना अपात्र घोषित केले आहे. पणन संचालकांच्या आदेशात म्हटले की, रिसोड बाजार समितीवर सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून निवडून आलेले तेजराव वानखेडे हे कुकसा गावचे पोलीस पाटील असल्याचे दाखल कागदपत्रावरून दिसून येते. निवडणुक नियमातील तरतुदीनुसार व कायद्यातील शेतकरी या संज्ञेच्या व्याखेत ते बसत नाही. त्यामुळे बाजार समितीवर सभासद म्हणून राहण्यास ते अपात्र आहेत, या निष्कर्षाप्रत येत अर्जदारांचे अपिल अर्ज मंजूर केला. पोलीस पाटील या शासकीय पदावर कार्यरत असल्याने तेजराव वानखेडे हे बाजार समितीवर सदस्य म्हणून राहण्यास अपात्र आहेत. त्यांना बाजार समितीचे सदस्य या पदावरून कमी करण्यात येत आहे, असा आदेश पणन संचालकांनी दिला. यामुळे बाजार समितीसह सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली.