रिसोड बाजार समितीत नव्या मुग खरेदीला प्रारंभ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:03 PM2018-08-21T13:03:42+5:302018-08-21T13:05:02+5:30
रिसोड (वाशिम) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मूग खरेदीला सोमवारपासून प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशी मुगाला जिल्ह्यात सर्वाधिक ५ हजार ५१ रुपये प्रतिक्विंटलचा भाव देण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मूग खरेदीला सोमवारपासून प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशी मुगाला जिल्ह्यात सर्वाधिक ५ हजार ५१ रुपये प्रतिक्विंटलचा भाव देण्यात आला. दरम्यान, मूग खरेदीला घेवून आलेल्या सेनगाव (जि.हिंगोली) तालुक्यातील महाळशी येथील शेतकºयांचा यावेळी रिसोड बाजार समितीच्या संचालक मंडळाने सत्कार केला.
बाजार समितीत पहिल्या दिवशी झालेल्या हर्राशीतील बोलीत खरेदीदार कुंडलीक जायभाये यांनी सर्वाधिक बोली ५ हजार ५१ रुपयांची बोलुन मुग खरेदी केला आहे. यावेळी बाजार समितीचे संचालक विठ्ठलराव आरु, पुरुषोत्तम तोष्णीवाल, गोपाल काबरा, गोविंद कासट यांच्याहस्ते मुग विक्रेत्या शेतकºयांचे शाल, श्रीफळ देवुन स्वागत करण्यात आले. व्यापारी सिध्देश्वर कोठुळे, बबनराव सुरुशे, किसन अग्रवाल, रमेश गायकवाड, संजय अग्रवाल, रवि छित्तरका, अजय अग्रवाल, किशोर कोठुळे, महादेव कोठुळे, संजय छित्तरका यांच्यासह हमाल मापारी, संघटनेचे प्रतिनिधी कैलास शिंदे, शेतकरी यांची यावेळी उपस्थिती होती.
संततधार पावसामुळे आवक मंदावली!
जिल्ह्यात गेल्या सात ते आठ दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पुरपरिस्थिती देखील निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम कृषि उत्पन्न बाजार समितीवरही झाला असून शेतकरीच फिरकेनासे झाल्याने शेतमालाची आवक मंदावली आहे. यामुळे काही बाजार समित्या सद्या बंद राहत असल्याचे दिसून येत आहे.