रिसोडची बाजारपेठ बुधवारपर्यंत राहणार बंद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 12:33 PM2020-06-15T12:33:18+5:302020-06-15T12:33:25+5:30
दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय रिसोड येथील व्यापारी महासंघाने १४ जून रोजी घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : जिल्ह्यात ११ जूनपर्यंत कोरोनामुक्त असलेल्या रिसोड तालुक्यात १२ जूनला कोरोनाचा शिरकाव झाला. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १४ जून, रविवारी दुपारी २ वाजतापासून ते बुधवार, १७ जूनपर्यंत बाजारपेठ व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय रिसोड येथील व्यापारी महासंघाने १४ जून रोजी घेतला.
रिसोड तालुक्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नसल्याने नागरिक बिनधास्त शहरात फिरत होते. बाजारपेठेतही विविध वस्तू, साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची एकच गर्दी होत होती. १२ जून रोजी दोन आणि १३ जून रोजी ३ असे दोन दिवसात पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. विशेष म्हणजे बाहेरगावावरून आलेल्या नागरिकांमुळे शहर व तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने व्यापाऱ्यांसह आरोग्य यंत्रणा, पोलीस व तालुका प्रशासन अलर्ट झाले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी रिसोड येथील व्यापारी महासंघाने स्वयंस्फुर्तीने रिसोड बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय १४ जून रोजी रिसोड व्यापारी महासंघातर्फे येथील व्यापारी संजय बगडिया यांचे दुकानावर आयोजित सभेमध्ये घेतला. बुधवार, १७ जूनपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. यादरम्यान १८ जूनपासून व्यापार सुरू करण्यावर चर्चा करण्यात आली. चर्चेत गुरुवारपासून सुरू होणाºया दुकानांची वेळ सकाळी नऊ ते दुपारी २ अशी राहिल, असे ठरविण्यात आले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, याला जनतेने देखील सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यापारी संघटनने व्यक्त केली. रिसोड शहरात ग्रामीण भागातून विशेषत: अन्य कोरोनाग्रस्त जिल्ह्यातून मोठ्या संख्येने लोक खरेदी करण्यासाठी गर्दी करीत असतात. त्यामुळे समुह संसर्गाचा धोका नाकारता येत नाही. बैठकीला व्यापाऱ्यांची उपस्थिती होती.
व्यापारी मंडळाचे वाशिम बंदचे आवाहन
वाशिम शहरातील व्यापाºयांनी आपापली दुकाने बंद ठेवून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन व्यापारी मंडळाचे जिल्हाध्यक्ष जुगलकिशोर कोठारी यांनी केले. दरम्यान दुसºया संघटनेने मात्र बाजारपेठ बंदबाबत ठोस भूमिका न घेतल्याने संभ्रम निर्माण झाला.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी बुधवारपर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्याचे पाऊल उचलणे आवश्यक झाले होते. शहरात दिवसेंदिवस गर्दी वाढत होती. व्यापाºयांवर बंदचा परिणाम होईल; मात्र आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेणे आवश्यक होते.
- मदनसेठ बगडिया
अध्यक्ष, व्यापारी महासंघ रिसोड