रिसोड नगर परिषद निवडणूक; १२ नोव्हेंबरपासून नामांकन अर्ज भरण्याला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 01:39 PM2018-11-11T13:39:05+5:302018-11-11T13:40:15+5:30
रिसोड (वाशिम) : रिसोड नगर परिषदेच्या निवडणुकीत १२ नोव्हेंबरपासून नामांकन अर्ज भरण्याला सुरूवात होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) : रिसोड नगर परिषदेच्या निवडणुकीत १२ नोव्हेंबरपासून नामांकन अर्ज भरण्याला सुरूवात होत आहे.
नगर परिषद सदस्यांचा पाच वर्षांचा कालावधी संपुष्टात येत असल्याने ९ डिसेंबर २०१८ रोजी मतदान होणार आहे. थेट जनतेतून नगराध्यक्ष पदाची निवडणूक असल्याने, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा, विधानसभा निवडणुकीची रंगीत तालिम म्हणून रिसोड नगर परिषदेच्या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, भारिप-बमसं या प्रमुख पक्षांनी या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत आल्याने आतापासूनच निवडणूक अटितटीची बनल्याचे दिसून येते. कोणत्याही परिस्थितीत नगर परिषदेवर सत्ता मिळविण्यासाठी प्रत्येक पक्षाने प्रतिष्ठा पणाला लावली असली तरी दुसरीकडे काही पक्षात अंतर्गत गटबाजीही उफाळून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अंतर्गत गटबाजी टाळून स्वपक्षातील हितचिंतकांबरोबरच विरोधकांवर कशी मात करायची? याची फिल्डिंग लावली जात असल्याचे दिसून येते. शहरातील कॉर्नर बैठकांमुळे थंडीच्या हंगामातही राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रमुख पक्षांनी अद्याप नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहिर केला नसल्याने उत्सूकता अधिकच ताणली जात आहे.
९ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, १० डिसेंबर रोजी मतमोजणीनंतर निकाल जाहिर होणार आहे. तत्पूर्वी १२ नोव्हेंबरपासून उमेदवारी (नामांकन) अर्ज स्विकारण्याला सुरूवात होणार आहे. १२ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज स्विकारले जाणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)