रिसोड नगर परिषद निवडणूक; उपाध्यक्ष पदासाठी मोर्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 03:06 PM2019-01-18T15:06:01+5:302019-01-18T15:06:42+5:30

रिसोड (वाशिम) : रिसोड नगर परिषदेच्या पदाधिकारी, सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ २३ जानेवारीला संपुष्टात येणार असल्याने २४ जानेवारीला उपाध्यक्ष पदासाठी निवडणुक होत आहे.

Risod Municipal Council election;Lobbying for Vice President | रिसोड नगर परिषद निवडणूक; उपाध्यक्ष पदासाठी मोर्चेबांधणी

रिसोड नगर परिषद निवडणूक; उपाध्यक्ष पदासाठी मोर्चेबांधणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) : रिसोड नगर परिषदेच्या पदाधिकारी, सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ २३ जानेवारीला संपुष्टात येणार असल्याने २४ जानेवारीला उपाध्यक्ष पदासाठी निवडणुक होत आहे. उपाध्यक्ष पदासाठी मोर्चेबांधणी सुरू असून, विजयी कोण होणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागून आहे.
१० डिसेंबर २०१८ रोजी रिसोड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहिर झाला होता. अटितटीच्या झालेल्या या निवडणुकीत माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या वाशिम जिल्हा जनविकास आघाडीने नगराध्यक्ष पदासह नगरसेवकांच्या ९ पदांवर विजय मिळविला होता तर काँग्रेस तीन, शिवसेना तीन, भारिप-बमसं दोन आणि अपक्ष तीन असे पक्षीय बलाबल आहे. कुणालाही स्पष्ट बहुमत नसल्याने उपाध्यक्ष व विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. जनविकास आघाडीला केवळ दोन सदस्यांची गरज असून, त्या दृष्टिने जुळवाजूळव सुरू झाल्याचे विश्वसनीय सूत्र आहे. देश व राज्य पातळीवरील राजकारण आणि समविचारी पक्षांची महाआघाडी बघता रिसोड नगर परिषदेत काँग्रेस, शिवसेना व भारिप-बमसं यांची युती होते की जनविकास आघाडी आणि काँग्रेस मिळून नगर परिषदेची सत्ता बनते, याकडे शहरवासियांचे लक्ष लागून आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर रिसोड नगर परिषदेत समविचारी पक्ष एकत्र येण्याच्या हालचाली गतिमान झाल्याचे दिसून येते. तीन अपक्ष नगरसेवकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. २४ जानेवारीला उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक असल्याने बहुमताचा जादुई आकडा जूळविण्यासाठी जनविकास आघाडी तसेच काँग्रेस, शिवसेना, भारिप-बमसंतर्फे व्यूहरचना आखली जात असल्याने राजकीय वातावरण तापत आहे.

 
उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत काँग्रेसची शिवसेना किंवा अन्य कुठल्याही पक्षासोबत अद्याप युतीसंदर्भात चर्चा झालेली नाही. 
अमित झनक, आमदार
 
उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसंदर्भात सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन पुढील चर्चा केली जाणार आहे.
डॉ. चंद्रशेखर देशमुख, उपजिल्हा प्रमुख शिवसेना
 
पक्षाचे नगरसेवक तसेच वरिष्ठांच्या सुचनेनुसार पुढील रणनिती ठरविली जाईल. अद्याप युती, आघाडीसंदर्भात कुणाशी बोलणी झालेली नाही.
डॉ. नरेशकुमार इंगळे, पक्षनिरीक्षक, भारिप-बमसं
 
युती, आघाडीसंदर्भात कुणाशी चर्चा झाली नाही. समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न राहिल.
- अ‍ॅड. नकुल देशमुख,  प्रमुख जनविकास आघाडी

Web Title: Risod Municipal Council election;Lobbying for Vice President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.