जागे अभावी रिसोड येथील नाफेडच्या तूर खरेदीत व्यत्यय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 04:05 PM2018-04-30T16:05:25+5:302018-04-30T16:07:20+5:30
रिसोड: किमान आधारभूत किंमतीनुसार नाफेडच्या माध्यमातून तूर खरेदी करण्यासाठी १५ मे पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. मात्र, तूर साठवणूकीसाठी पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध नसल्याने विहित मुदतीत तूरीची खरेदी होणार की नाही याबाबत साशंकता आहे.
रिसोड: किमान आधारभूत किंमतीनुसार नाफेडच्या माध्यमातून तूर खरेदी करण्यासाठी १५ मे पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. मात्र, तूर साठवणूकीसाठी पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध नसल्याने विहित मुदतीत तूरीची खरेदी होणार की नाही याबाबत साशंकता आहे. रिसोड येथे ३३४१ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली असून, जवळपास ५५० शेतकऱ्यांची ६ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.
गतवर्षी शेतकऱ्यांना नानाविध संकटांना सामोरे जावे लागले. वातावरणात वेळोवेळी झालेल्या विपरित बदलांमुळे या पिकाला आधीच फटका बसला. विविध संकटातून वाचलेले तूर पीक शेतकऱ्यांच्या घरात आले. केंद्र सरकारने तूरीला किमान आधारभूत किंमत प्रती क्विंटल ५ हजार ४५० रुपये निश्चित केली आहे. मात्र, खासगी व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षा कमी दराने तूरीची खरेदी होत असल्याने नाफेड खरेदी केंद्राची मागणी पुढे आली होती. त्या अनुषंगाने रिसोड येथील खरेदी केंद्रावर हमीभावाने तूर खरेदी करण्यात आली. तत्पूर्वी शेतकऱ्यांची आॅनलाईन नोंदणी करण्यात आली. शासनस्तरावरून १८ एप्रिल रोजी नाफेडची तूर खरेदी बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. नाफेड खरेदी सुरू ठेवण्याची मागणी झाल्याने शासनाने १५ मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तूर मोजणीचा वेग आणि साठवणुकीसाठी पुरेशा प्रमाणात गोदामात जागा नसल्याने विहित मुदतीत तूर खरेदी होणार की नाही, याबाबत साशंकता आहे. रिसोड येथे ३३४१ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. १५ दिवसांत अडीच हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांची तूर मोजणी पूर्ण करण्याची कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे.