३१ जणांची नळजोडणी खंडीत; रिसोड नगर परिषद 'ॲक्शन मोड'वर, पाणीपट्टी वसुलीसाठी धडक मोहीम
By संतोष वानखडे | Published: September 6, 2022 07:13 PM2022-09-06T19:13:57+5:302022-09-06T19:15:50+5:30
रिसोड नगर परिषदेने पाणीपट्टी वसुलीसाठी धडक मोहीम राबवली आहे.
वाशिम: मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीत रिसोड नगर परिषद माघारल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित करताच, नगर परिषदेने 'ॲक्शन मोड'वर येत धडक मोहिम हाती घेतली. पाणीपट्टी न भरल्याने ६ सप्टेंबर रोजी ३१ जणांची नळजोडणी खंडीत केली असून, थकीत ग्राहक नगर परिषदेच्या रडारवर आले आहेत. नगर पालीकेचे मुख्याधिकारी निलेश गायकवाड यांनी थकीत मालमत्ता व नळजोडणीधारकांचे नळ कनेक्शन बंद करण्याची धडक मोहीम ६ सप्टेंबर पासुन सुरु केली.
या मोहीमेत कर निरीक्षक अब्दुल अजीज यांच्या नेतृत्वात पालिकेच्या दहा कर्मचाऱ्यांचे एक पथक गठीत करण्यात आले. नगरपालिकेच्या वतीने शहरातील थकीत नळ धारकांना वारंवार तोंडी व लेखी सूचना देऊन सुद्धा काही मालमत्ता धारक व नळधारक कर भरण्यास तयार नाहीत. परिणामी थकबाकीचा बोजा दिवसागणिक वाढतच चालला आहे. थकित नळ कनेक्शन धारकांना यापूर्वी नोटीस बजावण्यात आली होती. जे नळ कनेक्शन धारक पालिकेच्या वतीने वारंवार नोटीस सूचना देऊन सुद्धा कर भरण्यास तयार नाहीत, अशांचे नळ कनेक्शन बंद करण्याचा सपाटा पालिकेने लावला.
३१ जणांची नळजोडणी खंडीत
३१ जणांची नळजोडणी खंडीत करण्यात आली. पालिकेच्यावतीने शहरात ध्वनीक्षेपकाद्वारे मालमत्ता व नळधारकांना कर भरण्यासंदर्भात सूचना देण्यात येत आहे. कर विभागाचे कर्मचारी शहरातील प्रत्येक प्रभागात घरोघरी जाऊन थकबाकी मालमत्ता व नळ धारकांकडून कर वसुल करीत आहेत. या मोहीमेत मुख्याधिकारी निलेश गायकवाड, कर निरीक्षक अब्दुल अजीज अब्दुल सत्तार हे स्वत: हजर राहून कर न भरणाऱ्या ग्राहकांची नळजोडणी खंडीत करीत आहेत.