रिसोड पंचायत समिती कार्यालयात रोजगार सेवकाचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 04:59 PM2018-10-02T16:59:54+5:302018-10-02T17:02:21+5:30
एका रोजगार सेवकाने गांधी जयंतीदिनी मंगळवार, २ आॅक्टोबर रोजी स्थानिक पंचायत समितीच्या कार्यालयात गटविकास अधिकाºयांसमोरच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
रिसोड : तालुक्यातील गोहगाव हाडे ग्रामपंचायतकडून कामकाजादरम्यान मानसिक त्रास होत असल्याचे कारण समोर करून एका रोजगार सेवकाने गांधी जयंतीदिनी मंगळवार, २ आॅक्टोबर रोजी स्थानिक पंचायत समितीच्या कार्यालयात गटविकास अधिकाºयांसमोरच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यामुळे रिसोड शहरात एकच खळबळ उडाली.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, अमोल रमेश हाडे (वय ३५) हा गोहगाव हाडे ग्रामपंचायतमध्ये रोजगार सेवक म्हणून कार्यरत आहे. गत काही दिवसांपासून तो मानसिक तणावाखाली वावरत होता. त्याच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायतमधील काही सदस्य त्यास चुकीच्या पद्धतीने स्वाक्षरी करण्यास दबाव टाकत मानसिक त्रास देत होते. याबाबत अमोलने जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाकडे रितसर तक्रार करून २ आॅक्टोबर रोजी आत्मदहनाचा इशारा देखील दिला होता. त्याचे गांभीर्य लक्षात घेवून रिसोड पोलिस स्टेशनचे कर्मचारी गत दोन दिवसांपासून अमोलच्या शोधात होते. अशातच आज गांधी जयंती साजरी करण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकाºयांसह अन्य कर्मचारी उपस्थित झाले असताना अमोल हाडे याने तेथे येवून सोबत आणलेले विषारी द्रव्य प्राशन केले. यादरम्यान तेथे तैनात असलेले हेड कॉन्स्टेबल संजय आमटे व पो. कॉ. सुनिल पवाने यांनी तत्काळ अमोलला ताब्यात घेऊन रिसोेड ग्रामिण रुग्णाालयात उपचारार्थ दाखल केले. गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकळे यांनीही रुग्णालयात धाव घेवून अमोलच्या प्रकृतीची वास्तपुस्त केली.
अमोल हाडे याचा ग्रामपंचायत सदस्यांची अंतर्गत वाद असून त्यातूनच त्याने मंगळवारी विषारी औषध प्राशन केले. त्याने दोन दिवसांपूर्वी यासंदर्भात ‘आॅनलाईन’ तक्रार केली होती. त्यानुसार, त्यास संपर्क साधण्याचा प्रयत्न देखील केला; परंतु तो झाला नाही. अशातच आज त्याने पंचायत समितीत येवून अचानक हे पाऊल उचलले. याबाबत पंचायत समिती स्तरावरून चौकशी केली जाईल.
- शिवशंकर भारसाकळे
गटविकास अधिकारी, पंचायत समिती, रिसोड