भर पावसाळ्यात नद्यांची अवस्था भयावह; ४६ धरणांमध्ये मृत साठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 03:48 PM2019-09-01T15:48:44+5:302019-09-01T15:48:51+5:30

मोठ्या स्वरूपातील पावसाअभावी जिल्ह्यातील नद्या अद्याप वाहत्या झालेल्या नाहीत.

The rivers' conditions are dire ; Dead reserves in 46 dams! | भर पावसाळ्यात नद्यांची अवस्था भयावह; ४६ धरणांमध्ये मृत साठा!

भर पावसाळ्यात नद्यांची अवस्था भयावह; ४६ धरणांमध्ये मृत साठा!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ६० टक्के पर्जन्यमान झाले आहे. संततधार अथवा मोठ्या स्वरूपातील पावसाअभावी जिल्ह्यातील नद्या अद्याप वाहत्या झालेल्या नाहीत. १३४ पैकी ४६ धरणांमध्ये केवळ मृत जलसाठा शिल्लक आहे. दरम्यान, आगामी काही दिवसांत मोठा पाऊस होऊन हे चित्र न बदलल्यास संपूर्ण जिल्ह्यात पाण्यासाठी हाहा:कार माजण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही बाब लक्षात घेऊन धरणांमधील आहे तेवढा पाणीसाठा पिण्यासाठी राखून ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वाशिम जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ७९८.७० मिलीमिटर पाऊस कोसळतो. १ जून ते ३१ आॅगस्ट या कालावधीत तो ६३१.७७ मिलीमिटर असणे अपेक्षित आहे. यावर्षी मात्र त्यात तब्बल १५०.६४ मिलीमिटरने घट झाली असून ४८१.१३ मिलीमिटर एवढाच पाऊस कोसळला आहे. वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत त्याची टक्केवारी ६०.२४ आहे. दरम्यान, परिणामकारकरित्या घटलेल्या पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा, काटेपूर्णा, अडाण-मडाण, बेंबळा, स्वासीन यासह उपनद्या अद्यापपर्यंत वाहत्या झालेल्या नाहीत. दुसरीकडे जिल्ह्यातील ३ मध्यम आणि १३१ लघू अशा एकंदरित १३४ धरणांच्या पातळीतही अपेक्षित वाढ झालेली नाही. गंभीर बाब म्हणजे ४६ धरणांमध्ये आजही मृत साठा शिल्लक असून ५० ते ७५ टक्के भरलेल्या धरणांची संख्या केवळ ६ आहे. या विदारक स्थितीमुळे आतापासूनच पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक ठरत आहे.


रब्बी हंगामात जाणवणार सिंचनाचा प्रश्न
वार्षिक सरासरीच्या तुलनेत जिल््याच्या पर्जन्यमानात सद्य:स्थितीत ४० टक्क्यांची तूट आहे. सप्टेंबर या पावसाळ्याच्या शेवटच्या दिवसांत ती भरून निघणे अशक्य असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. ही बाब प्रत्यक्षात खरी झाल्यास आहे ते पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याशिवाय पर्याय उरणार नाही. यामुळे रब्बी हंगामात सिंचनाचा प्रश्न गंभीर होण्याचे संकेत वर्तविण्यात ेयत आहेत.


मंगरूळपीर ‘डेंजर झोन’मध्ये
जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुका यंदा ‘डेंजर झोन’मध्ये असून या तालुक्यातील धरणांमध्ये आजमितीस केवळ १० टक्के जलसाठा आहे. यापाठोपाठ रिसोड १४, मालेगाव १५, मानोरा १६, कारंजा १९ आणि वाशिम तालुक्यातील धरणांमध्ये ३५ टक्के जलसाठा झाला आहे.


समाधानकारक पावसाअभावी जिल्ह्यातून वाहणाºया नद्या अद्यापपर्यंत वाहत्या झालेल्या नाहीत. धरणांच्या पातळीतही वाढ झालेली नाही. आगामी काही दिवसात मोठा पाऊस न झाल्यास परिस्थिती गंभीर होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन धरणांमध्ये आहे तेवढे पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही.
- प्रशांत बोरसे
कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, वाशिम

Web Title: The rivers' conditions are dire ; Dead reserves in 46 dams!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.