जिल्हा रुग्णालय परिसरातील रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:18 AM2021-03-04T05:18:55+5:302021-03-04T05:18:55+5:30
वाशिम हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असून, या ठिकाणी रुग्णांच्या सोयीसाठी भव्य जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत वसलेली आहे. त्याठिकाणी दैनंदिन ...
वाशिम हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असून, या ठिकाणी रुग्णांच्या सोयीसाठी भव्य जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत वसलेली आहे. त्याठिकाणी दैनंदिन विविध आजारांतील रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. रुग्णवाहिकांचीही नियमित वर्दळ असते. असे असताना प्रवेशद्वारातून आतमध्ये येणाऱ्या एकमेव रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. गेल्या ८ ते १० वर्षांपासून रस्त्याची साधी डागडूजीदेखील आरोग्य प्रशासनाने केलेली नाही. पावसाळ्यात तर खड्ड्यांमध्ये पाणी साचून रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि रुग्णवाहिकांच्या चालकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. या समस्येकडे लक्ष पुरवून रस्त्याची विनाविलंब डागडूजी किंवा नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
................
‘मनसे’चा आंदोलनाचा इशारा
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये येणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रुग्ण, त्यांचे नातेवाईक व रुग्णवाहिकाचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. ही समस्या निकाली काढा; अन्यथा आंदोलन करू, असा इशारा ‘मनसे’ने दिला आहे. यासंदर्भात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व जिल्हा शल्य चिकित्सकांकडे निवेदन सादर केले.