इंझोरी-म्हसणी रस्त्यावर चिखलातून काढावा लागतो मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:26 AM2021-06-21T04:26:29+5:302021-06-21T04:26:29+5:30
मानोरा तालुक्यातील म्हसणी या गावाला कारंजा-मानोरा या मुख्य रस्त्याशी जोडण्यासाठी इंझोरी-म्हसणीदरम्यान ७ किलोमीटर अंतराच्या डांबरी रस्त्याची निर्मिती करण्यात आली ...
मानोरा तालुक्यातील म्हसणी या गावाला कारंजा-मानोरा या मुख्य रस्त्याशी जोडण्यासाठी इंझोरी-म्हसणीदरम्यान ७ किलोमीटर अंतराच्या डांबरी रस्त्याची निर्मिती करण्यात आली आहे. या रस्त्यामुळे इंझोरी आणि म्हसणी येथील ग्रामस्थांनाही दळणवळणाची चांगली सुविधा उपलब्ध झाली. या मार्गावरून दुचाकी, ऑटोरिक्षा, ट्रॅक्टरसह मालवाहू वाहनांची वर्दळ नेहमीच सुरू असते. प्रामुख्याने ग्रामीण भागातून शहरात विविध कामानिमित्त येणारे ग्रामस्थ आणि शेतमालाची बाजारात विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांची अनेक वाहने धावतात. या रस्त्याशिवाय म्हसणी गावाला कारंजा-मानोरा रस्त्याशी जोडणारा दुसरा कुठलाही रस्ता नाही. त्यामुळे या रस्त्याची स्थिती चांगली असणे आवश्यक असताना सद्य:स्थितीत या रस्त्यावरील डांबर पूर्णपणे नाहीसे झाले असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. आता या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचून गटार तयार झाले आहे. त्यामुळे चालकांना वाहन चालविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकवून वाहन पुढे न्यावे लागते.
---------------
तीन वर्षांपूर्वीच झाली होती दुरुस्ती
साधारण २० वर्षांपूर्वी इंझोरी-म्हसणी रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या काही वर्षांपूर्वी या रस्त्याची दुर्दशा झाल्याने बांधकाम विभागाकडून तीन वर्षांपूर्वी पुन्हा या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. तथापि, अवघ्या तीन वर्षांच्या काळातच या रस्त्यावरील डांबर नाहीसे होऊन खड्डे पडले आहेत. त्यामुळे चालकांसह, प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याने या रस्ता कामाच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहे.
--------
निधी मंजूर होऊनही काम नाही
इंझोरी-म्हसणी या ७ किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट असल्याने चालकांसह प्रवाशांना अतोनात त्रास होत आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ‘लोकमत’ने वारंवार वृत्त प्रकाशित केल्यानंतर आमदार राजेंद्र पाटणी यांनी उन्हाळ्यातच रस्ता कामासाठी निधीही मंजूर करून घेतला; परंतु अद्याप या रस्त्याचे कामच सुरू झाले नाही. त्यामुळे प्रशासनाच्या दिरंगाईबाबत रोष व्यक्त होत आहे.