सततच्या पावसामुळे रस्त्यांची दैना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:43 AM2021-07-27T04:43:36+5:302021-07-27T04:43:36+5:30
गत काही महिन्यांपूर्वीच काजळंबा-चिंचखेडा या रस्त्याच्या डागडुजीचे काम करण्यात आले होते; परंतु संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे कामाचा दर्जा आधीच खालावलेला ...
गत काही महिन्यांपूर्वीच काजळंबा-चिंचखेडा या रस्त्याच्या डागडुजीचे काम करण्यात आले होते; परंतु संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे कामाचा दर्जा आधीच खालावलेला असताना गत आठवड्यात पावसामुळे या रस्त्यांची वाट लागली आहे. या रस्त्यादरम्यान चार नाले असताना त्यावर अद्यापही मजबूत अशा पुलांची उभारणी करण्यात आली नाही. या संदर्भात ग्रामस्थांनी तालुका ते जिल्हास्तरापर्यंत प्रशासनाकडे निवेदन सादर केले; परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यात २३ जुलै रोजी आलेल्या जोरदार पावसामुळे या रस्त्यावर नाल्यांचे पाणी आल्याने रस्ताच वाहून गेला. आता या रस्त्यावर सर्वत्र केवळ चिखल आणि दगडच उरले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर पायी चालणेही कठीण झाले आहे.
------------
रस्त्याची त्वरित डागडुजी करण्याची मागणी
गत आठवड्यात सततच्या पावसामुळे चिंचखेडा-काजळंबा मार्गावर नाल्याचे पाणी आल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांसह शेतकऱ्यांची वहिवाटच बंद पडल्यात जमा असल्याने या रस्त्याची तातडीने डागडुजी करण्याची मागणी चिंचखेडा आणि काजळंबा गावातील नागरिकांच्यावतीने करण्यात आली आहे. या संदर्भात ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेपर्यंत निवेदनही दिले आहे.