नगर परिषद, बांधकाम विभागाच्या टोलवाटोलवीत रस्त्याची लागली वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 02:58 PM2019-06-02T14:58:42+5:302019-06-02T14:59:42+5:30
रिसोड (वाशिम) : नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टोलवाटोलवीत रिसोड शहरातील सिव्हिल लाईन मार्गाची वाट लागली आहे.
- विवेकानंद ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) : नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टोलवाटोलवीत रिसोड शहरातील सिव्हिल लाईन मार्गाची वाट लागली आहे. ९०० मीटर अंतराच्या या रस्त्यावर जवळपास ९०० खड्डे पडल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. रस्ता हस्तांतरणाचा प्रस्ताव तांत्रिक कचाट्यात अडकला असून, नगर परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाने समन्वयातून यावर तोडगा काढावा, असा सूर शहरवासियांमधून उमटत आहे.
शहरातील प्रमुख मार्ग म्हणून सिव्हिल लाईन रस्त्याकडे पाहिले जाते. नगर परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे या रस्त्याची वाट लागली आहे. कालुशा दर्गा ते वाशिम नाका हा ९०० मिटर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे. नगर परिषदेला सदर रस्ता हस्तांतरीत करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर केला आहे. परंतु दिलेल्या अटीमुळे हस्तांतरणाचा मार्ग सुकर झाला नाही. तांत्रिक अडचणीत हा प्रस्ताव अडकला आहे. ९०० मीटर अंतर असलेल्या या मार्गावर जवळपास ९०० खड्डे पडले आहेत. अगोदरच रस्ते अरुंद आणि त्यातही रस्त्यावर अतिक्रमण असल्याने वाहतुक व्यवस्था कोलमडली आहे. पथदिवे दुरूस्ती व अन्य कामांसाठी या रस्त्यावर नेहमीच खोदकाम राहत असल्याने रस्त्याची वाट लागली आहे
पोलीस स्टेशन समोरील रस्ता दुभाजकाच्या दोन्ही बाजूने खोदकाम केले आहे तसेच काही दिवसांपूर्वी एका मोबाईल कंपनीने पंचायत समिती समोरील रस्ता खोदून ठेवला आहे. काही बांधकामधारकांची रेतीसुद्धा सदर रस्त्यावर आली आहे. त्यामुळे वाहन चालविणे ही एक कसरत ठरत आहे. सन २०१४ मध्ये दिड कोटी रुपये खर्च करून रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले होते. अल्पावधीच रस्ता खड्डामय झाला आहे. याकडे बांधकाम विभागाने लक्ष देणे आवश्यक ठरत आहे.
केबल बदलण्याचे काम सुरू आहे. नवीन केबल टाकण्यासाठी खोदकाम केले जात आहे.
-गणेश पांडे
मुख्याधिकारी, नगर परिषद रिसोड