पुलासाठी खोदलेल्या रस्त्याचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:42 AM2021-05-09T04:42:02+5:302021-05-09T04:42:02+5:30
किन्हीराजा हे नागपूर-मुंबई राज्य महामार्गावरील जवळपास १५ हजार लोकवस्तीचे गाव आहे. बसथांब्यावरून गावात जाणाऱ्या एकमेव मुख्य रस्त्यावरील पुलाचे बांधकाम ...
किन्हीराजा हे नागपूर-मुंबई राज्य महामार्गावरील जवळपास १५ हजार लोकवस्तीचे गाव आहे. बसथांब्यावरून गावात जाणाऱ्या एकमेव मुख्य रस्त्यावरील पुलाचे बांधकाम १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात येत आहे. त्यासाठी १७ एप्रिल रोजी संपूर्ण रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. अशात सदर बांधकाम हे नियमबाह्य होत असल्याची तक्रार मालेगाव पंचायत समितीकडे करण्यात आली. त्याची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार हे बांधकाम बंद करण्यात आले; मात्र मुख्य रस्त्यावर पुलाच्या बांधकामासाठी खोदकाम झाल्याने गावातील वाहतूक पूर्णपणे प्रभावित झाली आहे. गावातील मुख्य रस्त्यावर पोलीस चौकी, मुख्य बाजारपेठ, दवाखाने, मेडिकल व बसथांबा असल्यामुळे किन्हीराजावासीयांना ये-जा करण्यासाठी गावाच्या बाहेर असलेल्या रस्त्याचा वापर करावा लागत आहे. पुलाचे बांधकाम सुरू करतेवेळी पर्यायी वळण रस्ता करायला पाहिजे होता; मात्र संबंधित अधिकाऱ्यांना त्याचेही भान राहिले नाही. तथापि, बंद करण्यात आलेल्या पुलाचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे तालुका उपाध्यक्ष पवन गजानन इंगळे व भाजयुमोचे रविराज जयसिंगराव घुगे यांनी मालेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.