पूर्णा नदीवर रास्तारोको, लोणीत मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 03:36 PM2018-08-09T15:36:59+5:302018-08-09T15:40:36+5:30
सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजीत बंदला संग्रामपुर तालुक्यात बंदला सर्वधर्मीय पाठिंबा मिळाला. तालुक्यात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. खिरोडा येथील पूर्णा नदीवर रास्तारोको करण्यात आला.
संग्रामपूर(वाशिम) : सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजीत बंदला संग्रामपुर तालुक्यात बंदला सर्वधर्मीय पाठिंबा मिळाला. तालुक्यात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. खिरोडा येथील पूर्णा नदीवर रास्तारोको करण्यात आला. यावेळी काही युवकांनी टायर जाळून सरकारचा निषेध नोंदवला. तर आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. लोणी येथे आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्राही काढली होती.
संग्रामपुर तालुक्यातील चांगेफळ निवाणा, संग्रामपुर, वरवट बकाल, पातुडार, मनार्डी, खिरोडा फाटा, एकलारा, बावनबिर, टुनकी, सोनाळा सह संपूर्ण तालुक्यात दुकाने ठेवण्यात आली होती. सकल मराठा समाजासह तालुक्यातील सर्वधर्मीय नेत्यांनी मोठ्यासंख्येने सहभाग दर्शवित बंद पाळण्याचे आवाहन केले.
लोणी :
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मुख्य मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने गुरुवारी बंद पुकारण्यात आला. या बंददरम्यान रिसोड तालुक्यातील लोणी बु. येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याची प्रतिकात्मक पे्रतयात्रा काढून दहनविधीही करण्यात आला. या अभिनव आंदोलनात सर्वधर्मियांनी सहभाग नोंदविला होता
पूर्णा नदीवर रास्तारोको :
वरवट बकाल संग्रामपुर रस्त्यावर व खिरोडा पुर्णा नदीच्या पुलावर टायर जाळून शासनाचा निषेध करण्यात आला. बंद दरम्यान सर्व बाजारपेठा, प्रतिष्ठाने कडकडीत बंद होत्या. सकल मराठा समाज आज रस्त्यावर दिसुन आला. समाजातर्फे काळयाफिती लावून शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. तालुक्यात सर्वत्र रस्ता रोको करण्यात आल्याने रस्त्यांवर शुकशुकाट होता. शाळा महाविद्यालयेही बंद होती.
प्रत्येक बसथांब्यावर पोलीस तैनात :
या बंददरम्यान कायदा आणि सुव्यवस्था कोलमडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. एसटीची प्रवासी वाहतूक बंद राहिली तरी, खासगी वाहतूक सुरळीत राहावी म्हणून जिल्ह्यातील सर्वच मुख्य मार्गावरील प्रत्येक थांब्यावर पोलीस तैनात ठेवण्यात आले होते. आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने गुरुवारी राज्यात पुकारलेल्या बंदला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळला. संपूर्ण जिल्ह्यात सकाळपासूनच बंदचे वातावरण तयार झाले होते. नागरिकांनी स्वेच्छेनेच आपली व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवली. शाळा महाविद्यालयांना संस्थाचालकांनी सुरक्षिततेची बाब लक्षात घेत, सुटी दिली. दरम्यान, दुपारपर्यंत रस्त्यांवर कुठलीही अप्रिय घटना घडली नाही.