रिसोडातील रस्ते झाले चिखलमय; वाहनधारक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 04:52 PM2019-06-30T16:52:33+5:302019-06-30T16:52:46+5:30
रिसोड (वाशिम) : रिसोड शहरातील प्रमुख मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी मुरूमाचा वापर करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) : रिसोड शहरातील प्रमुख मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी मुरूमाचा वापर करण्यात आला. परिणामी शनिवारच्या धो-धो पावसामुळे रस्ते चिखलमय झाले असून, वाहनधारकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
रिसोड शहरातील सिव्हिल लाईन या प्रमुख मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असून, निधी उपलब्ध नसल्याने रस्ता दुरूस्तीचे काम ठप्प आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत नगर परिषदेने मुरूम टाकून खड्डे बुजविले. दरम्यान, गत दोन दिवसात रिसोड शहरात धो-धो पाऊस झाला असून, रस्ते जलमय झाले आहेत तसेच सिव्हिल लाईन मार्गावर अनेकठिकाणी चिखलमय परिस्थिती असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. सिव्हिल लाईन मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी निधी प्रस्तावाला मंजूरी केव्हा मिळणार? असा प्रश्न अनुत्तरीय आहे.