दोन तासांच्या मुसळधार पावसानंतर रस्ते चिखलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:31 AM2021-07-17T04:31:07+5:302021-07-17T04:31:07+5:30
आसेगाव परिसरात बुधवार, १४ जुलै रोजी रात्री ९ ते १० वाजताच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे नांदगाव येथे ...
आसेगाव परिसरात बुधवार, १४ जुलै रोजी रात्री ९ ते १० वाजताच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे नांदगाव येथे भोपळपेंड नदीला आणि चिंचोली येथून वाहणाऱ्या नदीला पूर आला. या पुरामुळे शेतजमिनी खरडून गेल्या, तसेच अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके उद्ध्वस्त झाली. या पुरामुळेच नदी, नाल्यांवरील पुलासह रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल तयार झाला. आता या चिखलात दुचाकी आणि लहान चारचाकी, तसेच ऑटोरिक्षासारखी वाहने फसत असल्याने चालक त्रस्त झाले आहेत, तर ग्रामस्थांनाही ये-जा करणे कठीण झाले आहे.
------------
रस्त्यावर मुरूम टाकण्याची मागणी
आसेगाव परिसरातील नांदगाव आणि चिंचोली येथे नदी, नाल्यांवरील पूल आणि रस्ते चिखलमय झाले आहेत. त्यामुळे वाहने फसत असल्याने मार्ग काढणेच चालकांना कठीण झाल्याने या रस्त्यांवर वाहतूक ठप्प होत आहे. यामुळे ग्रामस्थांना होत असलेला त्रास लक्षात घेता संबंधित ग्रामपंचायतींनी या ठिकाणी मुरूम टाकून रस्ता सुरळीत करण्याची मागणी वाहन चालक व ग्रामस्थांकडून केली जात आहे.