वाशिम जिल्ह्यात ग्रामीण भागातील रस्ते झाले चिखलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 01:53 PM2019-07-31T13:53:12+5:302019-07-31T13:53:18+5:30
पावसामुळे ग्रामीण भागांतील कच्चे रस्ते चिखलमय झाले आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पिकांना आधार मिळून, प्रकल्पांत काही प्रमाणात जलसंचय होत असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे; परंतु या पावसामुळे ग्रामीण भागांतील कच्चे रस्ते चिखलमय झाले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची मात्र चांगलीच वाताहत सुरु झाली असून, ग्रामीण भागांत रोगराई पसरण्याची भितीही निर्माण झाली आहे.
मानोरा तालुक्यातील इंझोरी येथे उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाणी मिळावे म्हणून रस्ते फोडून पाणी पुरवठ्याची पाईपलाईन टाकण्यात आली. तथापि, पुन्हा या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले नाही. आता सततच्या पावसामुळे या रस्त्यावर चिखल तयार झाला आहे. त्यामुळे या रस्त्याने पायी चालणे कठीण झाले आहेच शिवाय वाहनेही फसत असल्याने शेतकरी व ग्रामस्थांची चांगलीच त्रेधा तिरपीट डत आहे. ग्रामपंचायतने हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. त्याशिवाय मंगरुळपीर तालुक्यातील शेलगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आणि मंगरुळपीर शहरालगत असलेल्या शिंदे कॉलनीत मजबूत रस्त्यांचा अभाव आहे. सततच्या पावसामुळे या परिसरातील सर्वच रस्ते चिखलमय झाले आहेत. ग्रामस्थांच्या घरासमोर पथदिवेही दिसत नाहीत. चिखलमय झालेल्या रस्त्यावरूनच ग्रामस्थांना दैनंदिन कामकाजासाठी येजा करावी लागत आहे. सतत घाणीतून येजा सुरू असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. तथापि, ग्रामस्थांच्या गैरसोयीकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. यामुळे ग्रामस्थांत रोषाचे वातावरण असून, ही समस्या दूर करण्याची मागणी रवि म्हातारमारे, ईश्वर पाटील, जोशी, विनोद पारधी, अनुराग भोयर, हरीश्चंद्र चव्हाण, गव्हाणे, वैभव हिवरकर, गोविंदराव धोत्रे, श्रीराम कालापाड, साबळे, भानुदास लुंगे, बाळू खेडकर, घनश्याम वाणी, खिराडे साहेब, खोंड, सावंत, प्रदिप अलोने, कर्पे, ऊगले, महल्ले, खडसे, हनुमान अव्हाळे यांनी केली आहे.
(वार्ताहर)
इंझोरी हे आमदार दत्तक गाव असून, या गावातील सर्वच रस्त्यांचे प्रस्ताव शासनदरबारी दाखल करण्यात आले आहेत. हे प्रस्ताव मंजूर होताच मुख्य रस्त्यासह सर्वच रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येईल.
-वनिता देविदास राठोड
सरपंच, इंझोरी (ता. मानोरा)