रस्त्यालगतचे पाणी घुसले लोणी गावात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:37 AM2021-07-26T04:37:19+5:302021-07-26T04:37:19+5:30
रिसोड : पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नाली बांधकाम न केल्याने रिसोड ते लोणार या रस्त्यालगतचे पाणी लोणी ...
रिसोड : पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नाली बांधकाम न केल्याने रिसोड ते लोणार या रस्त्यालगतचे पाणी लोणी बु. गावात घुसत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांनी शनिवार, २४ जुलै रोजी केली.
लोणार ते रिसोड हा राज्य मार्ग क्रमांक १८३ लोणी बु. गावाला लागून गेला असून या राज्य मार्गाचे काम हे लोणारपासून ते लोणी बु. पर्यंत पूर्ण झाले आहे. हा रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. रस्त्याच्या दुतर्फा पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नाली घेणे आवश्यक होते, परंतु रस्त्याच्या दुतर्फा नाली न घेतल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून मोठे नुकसान झाले आहे तसेच लोणी बु.पासून रिसोडकडे जाणाऱ्या रस्त्याचे जवळपास अर्धा किलोमीटर अंतरावरून पाणी हे सरळ गावामध्ये येत आहे. परिणामी लोणी बु. गावातील काही भागामध्ये पाणी साचल्याने तेथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला. रस्त्यावर सर्वत्र चिखल झाल्याने नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग रिसोड यांनी तत्काळ या प्रश्नाकडे लक्ष देऊन गैरसोय दूर करावी, अशी मागणी लोणी बु. येथील नागरिकांसह शेतकऱ्यांनी केली.
............
नुकसानभरपाई देण्याची मागणी
रस्त्यालगत नाली बांधकाम न केल्याने शेतात पाणी साचत आहे. यामुळे पिकांचे नुकसान होत असून, संबंधित कंत्राटदार व बांधकाम विभागाने पिकाची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. रस्त्यालगत त्वरित नाली बांधकाम करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली.