जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चिखली शाखेत दरोडा; ६.६० लाखांची रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2022 07:52 PM2022-01-16T19:52:41+5:302022-01-16T19:52:59+5:30
Robbery at Chikhali branch of District Central Bank : दरोडेखोरांनी गॅस कटरचा वापर करून तिजोरी फोडली.
रिसोड : रिसोड तालुक्यातील चिखली येथील दि. अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकून तब्बल ६ लाख ६० हजार ३०८ रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना १६ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. दरोडेखोरांनी गॅस कटरचा वापर करून तिजोरी फोडली.
रिसोड तालुक्यात अलिकडच्या काळात चोरी, दरोड्याच्या घटना वाढल्या आहेत. किनखेडा येथील गजानन अवचार यांच्या गोदामातून १२ लाख किंमतीचे सोयाबीन लंपास केल्याच्या घटनेची शाइ वाळत नाही; तेच हाकेच्या अंतरावर असलेल्या चिखली चिखली येथील दि. अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत दरोडेखोरांनी दरोडा टाकला. शाखाधिकारी भगवान आबासाहेब देशमुख यांनी रिसोड पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, ते शनिवारी दैनंदिन कामकाज आटोपून संध्याकाळी सहा वाजता बँकेच्या व्यवहाराची रोख रक्कम तिजोरीत ठेवून बँक बंद करून रिसोड येथे आपल्या निवासस्थानी परतले. सकाळी फोनवर बँकेशेजारी असलेल्या एका जणाने बँकेचे शटर तुटल्याचे माहिती दिली. दरोडेखोरांनी शटर तोडून बँकेत प्रवेश केला आणि गॅस कटरचा वापर करून तिजोरी फोडली. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला. घटनेची माहिती मिळताच सकाळी रिसोड पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला व तपास कामी वाशिम येथुन श्वान पथक तथा फिंगरप्रिंट एक्सपर्ट बोलण्यात आले होते.