ब्लड कॅन्सरग्रस्त रोहितला मिळाला मदतीचा हात
By admin | Published: July 10, 2017 07:50 PM2017-07-10T19:50:10+5:302017-07-10T19:50:10+5:30
रक्त पुरविण्याची जबाबदारी: रुग्णसेवा ग्रुप शेलूबाजार व एकता बचत गट वाशिमचा पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: तालुक्यातील बोरी मापारी येथील १३ वर्षीय चिमुकल्या रोहीत भाष्कर कांबळे या ब्लड कॅन्सर ग्रस्त मुलाच्या उपचारासाठी लागणारे रक्त पुरविण्याची जबाबदारी रुग्ण सेवा गृप यांनी घेतली असून, १० हजार ५०० रुपयाची रोख रक्कम रोहीतचे आजोबा प्रल्हाद कांबळे, यांच्याकडे दिली आहे. याच बरोबर वाशिम येथील एकता पुरुष बचत गट आणि मित्र मंडळाच्यावतीने रोहितच्या वडिलांच्या बँक खात्यावर ५ हजार १०० रुपयाची मदत जमा केली आहे. या सदंर्भात लोकमतने २ जुलै रोजी ह्यब्लड कॅन्सरग्रस्त रोहितच्या उपचारासाठी मदतीची हाकह्ण या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित मदतीचे आवाहन केले होते.
वाशिम तालुक्यातील बोरी मापारी येथील भाष्कर कांबळे व मायावती कांबळे या शेतमजुरांचा जन्मजात कुशाग्र बुद्धीचा मुलगा रोहितने आई वडील निरक्षर असताना आपल्या बुद्धीच्या जोरावर परीक्षा उत्तीर्ण करून नवोदय विद्यालयात प्रवेश मिळविला; परंतु नियतीचा डाव काही वेगळा होता, हे कुणाला ठाऊक. मातापिता त्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहत गरीबी विसरून आनंदात जीवन कंठीत असतानाच रोहितला ब्लड कॅन्सर झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांनी पोटच्या गोळ्याचा जीव वाचविण्यासाठी पोट उपाशी ठेवत त्याला नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दोन महिन्यापूर्वी नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे; परंतु घरची परिस्थीती जेमतेम असल्याने त्याच्या उपचारात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्याला औषध, सकस, आहारासाठी आर्थिक मदतीची गरज होती. या संदर्भात लोकमतमध्ये २ जुलै रोजी वृत्त प्रकाशित करून दानशुरांना मदतीचे आवाहन करण्यात आले होते याची दखल एकता पुरुष बचत गट व मित्र मंडळ वाशिमने घेवून रोहीतच्या वडीलाच्या खात्यावर ५ हजार १०० रुपयाची मदत जमा केली, तर शेलूबाजार येथील रुग्ण सेवा ग्रुपने रोहीतला लागणारे रक्त पुरवण्याची जबाबदारी उचलली, तसेच याच ग्रुपचे सुरेशचंद्र कर्नावट, डॉ.प्रविण मुरले, रवि फाजे, सुरेंद्र राऊत, पंकज गाडेकर, महेश सावके, ज्ञानेश्वर सावके, अर्जुन भिमराव सुर्वे, उमेश मसोडकर, प्रमोद चव्हाण, विठ्ठल गावंडे, उमेश सुर्वे, विकेश पानझाडे, राजू सुरजे, मंगेश फड, सोपान सावके, शिवा राजेश सावके यांनी रोहीतचे आजोबा प्रल्हाद कांबळे यांच्याकडे लोकमतच्या वाशिम कार्यालयात येऊन १० हजार ५०० रुपयाची आर्थिकमदतही दिली.