रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा पोहोचली वाशिम जिल्ह्यात
By संतोष वानखडे | Published: November 29, 2023 05:06 PM2023-11-29T17:06:44+5:302023-11-29T17:07:12+5:30
उद्या श्री शिवाजी हायस्कूलमध्ये युवक-युवतींशी साधणार संवाद
संतोष वानखडे, वाशिम: सर्वसामान्य जनता, युवा, शेतकरी, महिलांचे प्रश्न सरकारने गांभीर्याने घ्यावे, यासाठी आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष पदयात्रा काढली असून, मराठवाड्यातील सेनगाव तालुक्यातून ही यात्रा २९ नोव्हेंबरला वाशिम जिल्ह्यातील व्याड, चिखली (ता.रिसोड) येथे दाखल झाली.
आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेस २४ ऑक्टोबर रोजी पुणे येथे राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सुरूवात झाली होती. एकूण ४५ दिवसांच्या या पदयात्रेदरम्यान ८०० किलोमिटरचे अंतर पायदळ पूर्ण केले जाणार आहे. ही यात्रा २९ नोव्हेंबर रोजी हिंगोली जिल्ह्यातून रिसोड तालुक्यातील व्याड, चिखली सरनाईकमार्गे वाशिम जिल्ह्यात दाखल झाली. चिखली येथे काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अमित झनक, राकाॅंचे जिल्हाध्यक्ष बाबाराव पाटील खडसे, ज्येष्ठ नेते पांडूरंग ठाकरे, सुनिल पाटील, प्राचार्य अरुणराव सरनाईक यांच्यासह मान्यवरांनी या यात्रेचे स्वागत केले.
चिखली, वनोजा मार्गे ही यात्रा आसेगाव पेन येथे पोहोचली आहे. ठिकठिकाणी या यात्रेचे स्वागत केले जात आहे. २९ नोव्हेंबर रोजी रात्रीचा मुक्काम मोहजा येथे केला जाणार आहे. त्यानंतर ३० नोव्हेंबर रोजी वाशिम येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये रोहित पवार हे युवक-युवतींशी संवाद साधणार आहेत.