रोहयोची वादग्रस्त ठरलेली ४६ कामे थांबविली!
By admin | Published: May 17, 2017 02:51 AM2017-05-17T02:51:54+5:302017-05-17T02:51:54+5:30
वाशिम जिल्ह्यात सुरू होती नियमबाह्य कामे
संतोष वानखडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गंत नियमाला डावलून सुरू करण्यात आलेली ४६ कामे थांबविण्यात आली आहेत.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिर, नाला सरळीकरण व नाला खोलीकरण, पांदण रस्ते, रस्ता मजबूतीकरण, वृक्षारोपण, जलसंधारणाची कामे यासह विकासात्मक कामे जॉब कार्डधारक मजूरांकडून केली जातात. जिल्ह्यातील सिंचन विहिरींचा अनुशेष भरून काढण्यासाठी गत दीड वर्षांपासून सिंचन विहिरी व्यतिरिक्त अन्य कामे करण्यावर जिल्हा प्रशासनाने बंधन टाकले आहे. वरिष्ठांच्या पूर्वसंमतीने तातडीची कामे सुरू करता येतील, अशी अट टाकली होती. जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयाला डावलून अनेक ठिकाणी सिंचन विहिरीव्यतिरिक्त अन्य कामे सुरू असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेने विशेष पथकाद्वारे रिसोड तालुक्यातील आगरवाडी, चिंचाबा भर, देगाव, केनवड, मोठेगाव, मांडवा, शेलु खडसे, नंधाना, करडा, घोटा, कोयाळी, पेनबोरी, लेहणी, गोवर्धन, हराळ, या गावासह एकूण ४६ गावांतील कामांना ‘आॅन दी स्पॉट’ भेटी देऊन तपासणी केली. तपासणीअंती सदर कामे वरिष्ठांच्या पूर्वसंमतीविना सुरू असल्याचे पथकाच्या निदर्शनात आले.
काही कामांवर मजूर अनुपस्थित तसेच हजेरीपत्रक नसल्याचे तर काही कामे जूनीच असल्याचा गंभीर प्रकारही समोर आला होता. पांदण रस्ता, नाला सरळीकरण यासह अन्य प्रकारच्या एका-एका कामांसाठी सरासरी २० लाख रुपयांचा निधी दिला जाणार होता. मात्र, सदर कामेच वादग्रस्त असल्याचे विशेष पथकाच्या निदर्शनात आल्याने सदर कामे थांबविण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी दिले. आता या कामांची चौकशी सुरू केली आहे. या कामांना कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पूर्वसंमती दिली, सदर कामे सुरू करण्यासंदर्भात कोणत्या लोकप्रतिनिधीने शिफारस पत्र दिले, या शिफारस पत्रावरून कामे सुरू करण्याच्या सूचना कुणी दिल्या, या दृष्टिकोनातूनही चौकशी झाल्यास मोठे घबाड समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.