‘रोहयो’ घोटाळा जिल्हा परिषदेच्या दालनात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 11:26 AM2020-07-28T11:26:27+5:302020-07-28T11:26:36+5:30
जिल्हा प्रशासनाने १० दिवसांपूर्वी चौकशी अहवाल जिल्हा परिषदेकडे पुढील कार्यवाहीसाठी सुपूर्द केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींमधील रोजगार हमी योजनेंतर्गतच्या घोटाळ्याची चौकशी पूर्ण झाली असून, जिल्हा प्रशासनाने १० दिवसांपूर्वी चौकशी अहवाल जिल्हा परिषदेकडे पुढील कार्यवाहीसाठी सुपूर्द केला. आता याप्रकरणी जिल्हा परिषद प्रशासन नेमकी काय कारवाई करते, याकडे लक्ष लागून आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीण भागात शेततळे, फळबाग लागवड, पाणंद रस्ते, वृक्षारोपण यासह विविध प्रकारची कामे मजुरांद्वारे केली जातात. मालेगाव तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात आलेल्या विविध कामांमध्ये घोटाळा झाल्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी केल्या होत्या. यासंदर्भात ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करीत प्रशासनाचे लक्षही वेधले होते. नागरिकांच्या तक्रारी आणि ‘लोकमत’चे वृत्तांकन याची दखल घेत विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी डिसेंबर २०२० मध्ये या घोटाळ्याच्या चौकशीसाठी यवतमाळ आणि बुलडाणा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा समावेश असलेले १० विशेष पथक गठीत करीत चौकशीचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयास विनाविलंब सादर करण्याचे निर्देशही दिले होते. १२ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत ८६ ग्रामपंचायतींमध्ये ‘रोहयो’अंतर्गत झालेल्या विविध कामांची चौकशी या १० पथकाने केली. फेब्रुवारी महिन्यात या पथकाने संनियंत्रण अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.एम. तोटावार यांच्याकडे चौकशी अहवाल सादर केला. मात्र ‘मार्च एन्डींग’ आणि कोरोना विषाणू संसर्गाचे संकट यामुळे मध्यंतरी याप्रकरणी प्रशासकीय कार्यवाही प्रभावित झाली. दरम्यान, जुलै महिन्यात संनियंत्रण अधिकाºयांकडून जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाºयांकडून हा अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला. १० दिवसांपूर्वी हा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडे सादर करण्यात आला. याप्रकरणी जिल्हा परिषद प्रशासन काय कारवाई करते, याकडे लक्ष लागून आहे.
कारवाई होणार की क्लिन चीट मिळणार?
चौकशीअंती दोषी आढळून आलेल्या अधिकारी, कर्मचाºयांवर यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी अनेक कारवाया केल्या.
मालेगाव तालुक्यातील रोहयोंतर्गतचा घोटाळा विशेष गाजला असून, यामध्ये दिग्गजांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग असल्याची चर्चा आहे. त्यामुळे दोषी आढळून येणाºया या दिग्गजांवर खरोखरच कारवाई होणार की अहवालातील काही मुद्यांचा आधार घेत क्लिन चीट मिळणार? यावर सध्या जिल्हा परिषद वर्तुळात चर्चा रंगत आहे.
मालेगाव तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींमधील रोजगार हमी योजनेंतर्गतच्या कामांचा चौकशी अहवाल १० दिवसांपूर्वी प्राप्त झाला आहे. या अहवालांचे वाचन बारकाईने केले जाईल. दोषी आढळून येणाºयांविरूद्ध कारवाई प्रस्तावित करून हा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जाईल.
- कालिदास तापी
प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी
पंचायत विभाग, जिल्हा परिषद वाशिम
मालेगाव तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांची चौकशी करून संबंधित दहाही पथकांनी त्यांचे अहवाल सादर केले. या अहवालांचे वाचन करून त्यानुसार हा अहवाल सादर केला. विभागीय आयुक्तांकडून पुढील कार्यवाहीसाठी हा अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाकडे देण्यात आला.
- शंकर तोटावार
संनियंत्रण अधिकारी तथा
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम