रोहयोची कामे मिळेनात; कामगारांची पंचाईत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:36 AM2021-04-05T04:36:44+5:302021-04-05T04:36:44+5:30
चेकपोस्ट कार्यान्वित करण्याची मागणी उंबर्डा बाजार : येथून जवळच असलेल्या यवतमाळ-वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर सावळी फाट्यानजीक पोलिसांची गतवर्षी चेकपोस्ट होती. ...
चेकपोस्ट कार्यान्वित करण्याची मागणी
उंबर्डा बाजार : येथून जवळच असलेल्या यवतमाळ-वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर सावळी फाट्यानजीक पोलिसांची गतवर्षी चेकपोस्ट होती. यामुळे कोरोनावर बहुतांशी नियंत्रण मिळविणे शक्य झाले होते. तशीच चेकपोस्ट पुन्हा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
वीजपुरवठ्यात व्यत्यय; नागरिक त्रस्त
वाशिम : गत काही दिवसांपासून मोहरी (ता. मंगरूळपीर) परिसरातील गावांत वीजपुरवठ्यात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. शनिवारीदेखील दुपारच्या सुमारास असाच प्रकार घडल्याने नागरिकांची गैरसोय झाली. किमान उन्हाळ्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी होत आहे.
कनेक्टिव्हिटीअभावी शेतकरी त्रस्त
वाशिम : गत काही दिवसांपासून तालुक्यातील अनेक गावांमध्ये इंटरनेटची कनेक्टिव्हिटी मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे ऑनलाइन स्वरूपात चालणारी प्रशासकीय कामे खोळंबत असल्याचे दिसून येत आहे.
नाल्यांच्या सफाईबाबत उदासीनता
मानोरा : मानोरा तालुक्यातील आसोला खु. येथे नाल्यांची साफसफाई करण्याबाबत ग्रामपंचायत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. रविवारी गावातील सांडपाणी रस्त्यावरून वाहताना दिसले. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
वाहनचालकांच्या कागदपत्रांची तपासणी
वाशिम : शहराबाहेरच्या शेलू फाट्यानजीक वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तळ ठोकून रविवारी प्रत्येक वाहनचालकांकडील कागदपत्रांची तपासणी केली. नियम तोडणाऱ्यांवर यावेळी कारवाई करण्यात आली.
आधार केंद्र सुरू करण्याची मागणी
वाशिम : कोरोनामुळे जनता आधीच अडचणीत असताना अनेक ठिकाणची आधार केंद्रेही बंद आहेत. त्यामुळे बँक व्यवहारांसह विविध शासकीय कामांत अडचणी येत असल्याने जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागांसह शहरी भागांत आधार नोंदणी, दुरुस्ती केंद्र सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
पाणीटंचाई उपाययोजना राबविण्याची मागणी
मेडशी : मेडशी जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावत आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.
रोजगार देण्याची मागणी
इंझोरी : परिसरातील गावातून रोजगारासाठी परजिल्ह्यात गेलेले शेकडो कामगार गावी परत आले आहेत. मात्र, परिसरात शेतीशिवाय कोणतीच कामे नसल्याने हे कामगार बेरोजगार झाले आहेत. प्रशासनाने या कामगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.
रेतीअभावी रखडली घरकुलांची कामे
वाशिम : चालूवर्षीही अद्याप जिल्ह्यात एकाही रेतीघाटाचा लिलाव झालेला नाही. ही परिस्थिती गेल्या पाच ते सहा वर्षांपासून कायम आहे. यामुळे रेती मिळेनाशी झाल्याने विशेषत: घरकुलांची कामे रखडली आहेत.
माहूरवेशीच्या डागडुजीची मागणी
वाशिम : शहरातील पुरातन माहूरवेशीची पडझड झाली असून, हा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. तथापि, वेशीची डागडुजी करून साैंदर्यीकरण करण्याची मागणी श्याम उफाडे यांनी केली.