प्रमुख पक्षाच्या उमेदवारीसाठी इच्छुकांकडून रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:27 AM2021-06-29T04:27:41+5:302021-06-29T04:27:41+5:30
ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण रद्द झाल्यामुळे मानोरा तालुक्यातील कुपटा, तळप आणि फुलउमरी या जिल्हा परिषदेच्या गटात; तर गिरोली, शेंदूरजना, कोंडोली ...
ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण रद्द झाल्यामुळे मानोरा तालुक्यातील कुपटा, तळप आणि फुलउमरी या जिल्हा परिषदेच्या गटात; तर गिरोली, शेंदूरजना, कोंडोली आणि धामणी या चार पंचायत समितीच्या गटांमध्ये पोटनिवडणूक होऊ घातली आहे. दरम्यान, प्रमुख राजकीय पक्षाकडून उमेदवारी मिळवी, याकरिता इतरांपेक्षा मीच सरस कसा, हे पटवून देण्यात अनेक इच्छुक उमेदवार सध्या गुंतले आहेत.
तळप जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी सभापती शोभा सुरेश गावंडे आणि माजी पंचायत समिती उपसभापती रजनी गावंडे या दोन उमेदवारांनी उमेदवारी मिळविण्यासाठी कसब पणाला लावले आहे. शिवसेनेकडून विनोद चव्हाण यांनी आपली उमेदवारी पक्की झाली, असे आधीच जाहीर केले; मात्र माजी शिवसेना शहरप्रमुख तथा शेतकऱ्यांसाठी आदोलनाची मूठ आवळणारे मनोहर राठोड निवडणुकीत उतरल्याने तळप सर्कलची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत वर्तविण्यात येत आहेत. मनोहर राठोड यांच्या पत्नी छाया राठोड यांनीही शिवसेना पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचे जाहीर केल्याने शिवसेनेचा उमेदवार नेमका कोण, हा उत्सुकतेचा विषय बनला आहे.
भाजपाकडून नीळकंठ पाटील यांच्याव्यतिरिक्त दुसरा उमेदवार सध्यातरी दिसत नसून काँग्रेस पक्षाचे उमेदवार पुढे येताना दिसत नाही. कुपटा या जि.प. गटातून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असून दिलीप चव्हाण, माजी जि.प. सदस्य भाऊ नाईक तथा माजी आ. गजाधर राठोड यांच्या परिवारातील सदस्यांचे आगमन येथे होण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून तालुकाध्यक्ष रवी पवार, भाजपाकडून उमेश ठाकरे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी पं.स. उपसभापती अभिजीत पाटील हे नशीब आजमाविण्यास सज्ज झाले आहेत; तर हेमेंद्र ठाकरे हे कोणत्या पक्षाकडून निवडणुकीत उतरतात, यासंबंधी चर्चा रंगत आहे.