रोव्हर्स मशीनमुळे जमीन मोजणीची गती वाढली, १९०२ प्रकरणे निकाली; जिल्ह्यात १२ मशीनच्या मदतीने होतेय माेजणी
By दिनेश पठाडे | Published: October 8, 2022 06:37 PM2022-10-08T18:37:21+5:302022-10-08T18:37:21+5:30
दिनेश पठाडे वाशिम : अति तातडीची, तातडीची अथवा साध्या मोजणीची फी भरल्यानंतर देखील विहीत मुदतीत शेताची मोजणी होणे क्रमप्राप्त ...
दिनेश पठाडे
वाशिम: अति तातडीची, तातडीची अथवा साध्या मोजणीची फी भरल्यानंतर देखील विहीत मुदतीत शेताची मोजणी होणे क्रमप्राप्त असते. मात्र, कर्मचाऱ्यांचा अभाव व इतर कारणांमुळे मोजणी वेळेत होत नसल्याने प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढत गेली. मात्र, रोव्हर्स मशीनमुळे जमीन मोजणीची गती वाढली आहे. मार्चअखेर शिल्लक प्रकरणांची संख्या २,१६७ एवढी होती. शिल्लकसह एप्रिलपासून आतापर्यंत आलेल्या ३,०८० प्रकरणांपैकी १,९०२ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, केवळ १,१७९ प्रकरणे शिल्लक आहेत.
जिल्ह्यात केवळ ईटीएस मशीनच्या माध्यमातून जमिनीची मोजणी करण्यात येत असल्याने जमीन मोजणीची प्रकरणे प्रलंबित राहत होती. यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत होता. शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न म्हणून जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतून नवीन तंत्रज्ञानाच्या १२ रोव्हर्स मशीन उपलब्ध केल्या. रोव्हर्स मशीनने केवळ एका तासात २० हेक्टर जमिनीची मोजणी करता येत आहे. शिवाय रोव्हर्सद्वारे मोजणी करताना उपग्रहामार्फत मोजणी होत असल्याने शेतातील उंच पिके, झाडी-झुडपे व इमारतींची बांधकामे यांची अडचण येत नाही. तसेच फक्त बांधावरून चालत मोजणी होत असल्याने पिकांची मोजणी करताना नुकसान होत नाही.
मोजणीकामी पूर्वी झेंडे/ प्रिझम धरण्यासाठी मजुरांची आवश्यकता होती. तथापि रोव्हर्स मोजणीसाठी मजुरांची आवश्यकता नसल्याने मोजणीवेळी होणाऱ्या खर्चात बचत होत आहे. त्यामुळे जमीनधारक समाधानी आहेत. जिल्ह्यात सध्या शिल्लक असलेल्या प्रकरणांची लवकरच मोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत अर्ज केल्यानंतर विनाविलंब माेजणी होणार आहे.
२१६७ प्रकरणे होती प्रलंबित -
जिल्ह्यात भूमी अभिलेख विभागातील रिक्त पदांमुळे जमीन मोजणीला विलंब होत होता. त्यामुळे मार्चअखेर २,१६७ प्रकरणे प्रलंबित होती. रोव्हर्स मशीन उपलब्ध होताच जमीन मोजणीला वेग देण्यात आला. प्रलंबित प्रकरणे प्राधान्याने हाती घेऊन बहुतांश प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.