तिर्थक्षेत्र विकासासाठी वाशिम जिल्ह्याला ३ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 02:22 PM2018-11-11T14:22:00+5:302018-11-11T14:23:21+5:30
वाशिम : जिल्ह्यातील विविध तिर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी ग्रामविकास खात्याकडून तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: वाशिम जिल्ह्यातील विविध तिर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी ग्रामविकास खात्याकडून तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भक्तांना सोयी-सुविधा पुरविणे स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या उत्पन्नातून शक्य नसल्यामुळे भाजपा जिल्हाध्यक्ष तथा कारंजा मानोराचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी मानोरा तालुक्यातील कोंडोली तसेच मंगरूळपीर तालुक्यातील ईचा-नागीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी कोंडोली येथील श्रीक्षेत्र पितांबर महाराज संस्थानसाठी २ कोटी तर ईचा-नागी येथील श्री.महादेव संस्थानसाठी १ कोटी ३ लक्ष रूपयांच्या विकास कामांस प्रशासकीय मंजुरी दिली आहे.
ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरिता वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील तिर्थक्षेत्र श्री.पितांबर महाराज संस्थान, कोंडोली येथील भक्तनिवास बांधकामासाठी २ कोटी रूपयास शासनाने मान्यता दिली आहे. याशिवाय मंगरूळपीर तालुक्यातील श्री.महादेव संस्थान, ईचा-नागी करिता भक्तनिवास बांधकामासाठी ६०.७४ लक्ष, संरक्षण भिंत बांधकामासाठी २०.२७ लक्ष, स्वच्छतागृहासाठी १३.४५ लक्ष तर पाण्याच्या टाकीसाठी ९.५३ लक्ष असा एकुण १ कोटी ३ लक्ष ९९ हजार रूपयांचा निधी मंजुर केला आहे. वरील कामांची जबाबदारी ही वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे नियंत्रणाखाली करण्याचे शासनाने सुचविले असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी यांनी दिली आहे.