अखर्चित ७ कोटीच्या निधीतून होणार जलसंधारणाची कामे!
By admin | Published: April 4, 2017 12:01 AM2017-04-04T00:01:09+5:302017-04-04T00:01:09+5:30
शासनाकडून ५५ कोटी ४७ लाख रुपयांचा निधी मिळाला होता. त्यापैकी ७ कोटी १९ लाखाचा निधी अखर्चित होता. तो शासनाने परत दिल्याने जलसंधारणाची कामे होणार आहेत!
वाशिम : जिल्ह्यात २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन वर्षांत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध स्वरूपातील जलसंधारणाची कामे करण्यात आली. त्यासाठी शासनाकडून ५५ कोटी ४७ लाख रुपयांचा निधी मिळाला होता. त्यापैकी ७ कोटी १९ लाखाचा निधी अखर्चित होता. तो शासनाने परत दिल्याने या निधीतून राहिलेली कामे पूर्ण केली जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी ३ एप्रिल रोजी दिली.जलयुक्त शिवार अभियानातून नाला खोलीकरण, सिमेंट नाला बांध, रिचार्ज ट्रेन्च, मातीनाला बांध, समतल सलग चर यासह इतरही कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आली. त्याचा अपेक्षित फायदा होऊन दरवर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या संकटावर बहुतांशी मात करण्यात प्रशासनाला यश मिळत आहे. दरम्यान, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत शासनाकडून दोन वर्षांत वाशिम जिल्ह्याला मिळालेल्या ५५.४७ कोटी रुपयांच्या निधीतून मार्च २०१७ अखेर ७.१९ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला नव्हता. त्यामुळे तो परत जाण्याच्या मार्गावर होता. राज्यशासनाने मात्र इतर जिल्ह्यांप्रमाणेच वाशिम जिल्ह्यालाही हा निधी परत देण्याचा निर्णय जाहीर केल्याने या निधीतून अर्धवट अवस्थेत असलेली तद्वतच नव्याने हाती घेतल्या जाणारी जलसंधारणाची कामे पूर्ण करणे शक्य होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.