आरटीई: मोफत प्रवेशासाठी वाशिम जिल्ह्यात १०४९ अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 03:33 PM2019-03-17T15:33:03+5:302019-03-17T15:33:14+5:30
जिल्ह्यातील एकूण ९३ शाळांनी आॅनलाईन नोंदणी केली असून, मोफत प्रवेशासाठी राखीव असलेल्या ९४५ जागांसाठी जिल्हाभरातून १०४६ अर्ज पालकांनी सादर केले आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: आगामी शैक्षणिक सत्रासाठी आरटीई (शिक्षण हक्क अधिनियम) अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील एकूण ९३ शाळांनी आॅनलाईन नोंदणी केली असून, मोफत प्रवेशासाठी राखीव असलेल्या ९४५ जागांसाठी जिल्हाभरातून १०४९ अर्ज पालकांनी सादर केले आहेत. त्यात १०४६ आॅनलाईन, तर ३ मोबाईल अॅपद्वारे करण्यात आले आहेत.
समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतर्गत येणाऱ्या बालकांसाठी मोफत शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. २५ टक्के मोफत प्रवेशामध्ये सर्व माध्यमाच्या, सर्व बोर्डाच्या (राज्यमंडळ, सीबीएसई, आयसीएसई व आयबीसह) विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित प्राथमिक सर्व शाळा जेथे वर्ग पहिली किंवा पूर्व प्राथमिक स्तरावरील आहेत, अशा प्रकारच्या शाळा या प्रवेशासाठी पात्र आहेत. शैक्षणिक सत्र २०१९-२० मध्ये २५ टक्के मोफत प्रवेशासाठी वाशिम जिल्ह्यातील शाळांना ४ मार्चपर्यंत आॅनलाईन नोंदणी करण्याची मुदत होती. या मुदतीपर्यंत वाशिम जिल्ह्यातील ९३ शाळांनी नोंदणी केली आहे.
यात वाशिम तालुक्यातील २९ शाळा, मंगरुळपीर तालुक्यातील १७, शाळा, मालेगाव तालुक्यातील १६ शाळा, कारंजा तालुक्यातील ११ शाळा आणि रिसोड तालुक्यातील ११ शाळांचा समावेश असून, या ९३ शाळांत मोफत प्रवेशासाठी ९४५ जागा राखीव आहेत. दरम्यान, मोफत प्रवेशासाठी पाल्यांचे अर्ज सादर करण्यास ५ मार्चपासून सुरुवात झाल्यानंतर १६ मार्चपर्यंत जिल्हाभरातील १०४९ पालकांनी अर्ज केले आहेत. त्यात आॅनलाईन १०४६ आणि ३ मोबाईल अॅपद्वारे करण्यात आले आहेत. पालकांना आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी २२ मार्चपर्यंतची मुदत आहे. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर लॉटरी प्रक्रिया राबवून पहिली सोडत काढण्यात येणार आहे. दरम्यान तांत्रिक कारणामुळे या वेळापत्रकातही भविष्यात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शिक्षण हक्क अधिनियम अंतर्गत जिल्ह्यात २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांकडून २५ मार्चपर्यंत आॅनलाईन व मोबाईलद्वारे अर्ज सादर करता येणार आहेत. यात अद्याप बदल झालेला नाही. पुढे अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिल्यानंतर ते जाहीर करण्यात येईल.
-अंबादास मानकर
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
जि. प. वाशिम