‘आरटीई : पालकांची गैरसोय टाळण्यासाठी ‘मेस्टा’ संघटनेचा बहिष्कार मागे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 02:52 PM2019-05-04T14:52:16+5:302019-05-04T14:52:21+5:30
गोरगरिब पालकांची यामुळे गैरसोय होऊ लागल्याने ती टाळण्यासाठी बहिष्कार मागे घेण्यात आल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष गडेकर यांनी शुक्रवारी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ‘आरटीई अॅक्ट’अंतर्गत जिल्ह्यातील खासगी शिक्षण संस्थाचालकांना गेल्या पाच वर्षांपासून मोबदला न मिळाल्याने मोफत प्रवेश प्रक्रियेवर ‘मेस्टा’ संघटनेने बहिष्कार टाकला होता. मात्र, गोरगरिब पालकांची यामुळे गैरसोय होऊ लागल्याने ती टाळण्यासाठी बहिष्कार मागे घेण्यात आल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष गडेकर यांनी शुक्रवारी दिली. यामुळे रखडलेल्या मोफत प्रवेश प्रक्रियेस वेग मिळणार असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यातील खासगी शिक्षण संस्थाचालकांनी शासनाच्या निर्देशांचे पालन करित विद्यार्थ्यांना दरवर्षी २५ टक्के राखीव कोट्यातून शाळांमध्ये मोफत प्रवेश दिले. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून त्यापोटी देय असलेल्या शिक्षणशुल्काची प्रतिपुर्ती जिल्हा परिषदेकडून झाली नाही. यामुळे ‘मेस्टा’ या खासगी इंग्रजी शाळांच्या संघटनेने यंदा २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेवर बहिष्कार टाकला होता. परिणामी, पहिल्या लॉटरी पद्धतीत निवड झालेल्या ५४३ बालकांपैकी २ मे पर्यंत केवळ २९१ बालकांचेच प्रवेश होऊ शकले. यामुळे गोरगरिब पालक अक्षरश: हैराण झाले होते. यासह शाळांमधील कार्यरत विशेषत: महिला मुख्याध्यापकांना पालकांच्या रोषाचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेवून ‘मेस्टा’ संघटनेने मोफत प्रवेश प्रक्रियेवर टाकलेला बहिष्कार मागे घेतला. यामुळे पालकांची गैरसोय टळून मोफत प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत शासन आणि न्यायालयाकडे मात्र दाद मागितली जाईल, असे ‘मेस्टा’ संघटनेचे जिल्हाध्यक्ष गडेकर यांच्यासह विदर्भ अध्यक्ष अभिजित देशमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी सांगितले.