आरटीई : मोफत प्रवेशासाठी आज शेवटचा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 03:46 PM2019-09-21T15:46:14+5:302019-09-21T15:46:18+5:30
२१ सप्टेंबरपर्यंत या बालकांना प्रवेश संबंधित शाळांमध्ये घ्यावे लागणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : आरटीई अंतर्गंत (शिक्षण हक्क अधिनियम) चवथ्या लॉटरी पद्धतीतून ९ सप्टेंबर रोजी अमरावती विभागातील ८३८ बालकांची निवड झाली होती. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील ८८ विद्यार्थ्यांचा समावेश असून, २१ सप्टेंबरपर्यंत या बालकांना प्रवेश संबंधित शाळांमध्ये घ्यावे लागणार आहेत.
समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागास प्रवर्ग, दिव्यांग व वंचित घटकांतर्गत येणाऱ्या बालकांसाठी मोफत शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. अमरावती विभागात अंतिम मुदतीपर्यंत हजारो आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले होते. तीन लॉटरी पद्धतीतून २५ टक्के कोट्यातील जागा भरण्याचा प्रयत्न करण्यात आला. विहित मुदतीत अनेक बालकांनी प्रवेश घेतला नसल्यामुळे अनेक जागा रिक्त राहिल्या. या रिक्त जागांवर आॅनलाईन अर्ज सादर करणाºया बालकांना प्रवेश देण्यासाठी ९ सप्टेंबर रोजी चवथी लॉटरी काढण्यात आली. यामध्ये अमरावती विभागातील वाशिम जिल्ह्यातील ८८ याप्रमाणे यवतमाळ १७८, अकोला १२१, अमरावती २४३ आणि बुलडाणा २०८ अशा एकूण ८३८ बालकांची निवड झाली. २१ सप्टेंबरपर्यंत या बालकांना संबंधित शाळेत प्रवेश घ्यावे लागणार आहेत. अजून काही बालकांनी शाळेशी संपर्क साधला नसल्यामुळे प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. संबंधित पालकांनी संबंधित शाळेशी संपर्क साधावा, कागदपत्रांची पडताळणी करावी, असे आवाहन प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे.
कागदपत्रे सादर न केल्यास प्रवेश मिळणार नाही
निवड झालेल्या बालकांच्या पालकांना संबंधित पंचायत समिती शिक्षण विभागाच्या पडताळणी समितीसमोर आवश्यक ती कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. २१ सप्टेंबरपर्यंत संबंधित शाळा तसेच संबंधित पंचायत समितीच्या शिक्षण विभागाशी संपर्क न साधल्यास बालकांना मोफत प्रवेशापासून वंचित राहावे लागणार आहे. वाशिम जिल्ह्यातील ८८ बालकांची निवड झाली. या बालकांनी प्रवेशासाठी २१ सप्टेंबरपर्यंत संबंधित शाळा किंवा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी केले आहे.