आरटीई : अमरावती विभागात १२ दिवसात केवळ २१२ शाळांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 03:25 PM2020-02-02T15:25:22+5:302020-02-02T15:25:34+5:30
शाळा नोंदणीसाठी उरले केवळ चार दिवस !
- संतोष वानखडे
वाशिम : आरटीई अंतर्गत (राईट टु एज्युकेशन) पात्र बालकांना इयत्ता पहिल्या वर्गात मोफत प्रवेश देण्यासाठी ११ फेब्रुवारीपासून आॅनलाईन प्रवेश अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. तत्पूर्वी खासगी शाळांना २१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी या दरम्यान नोंदणी करावी लागणार आहे. अमरावती विभागात २ फेब्रुवारीपर्यंत केवळ २१२ शाळांची नोंदणी झाली आहे.
शिक्षण हक्क कायद्याने (राईट टु एज्युकेशन) मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना २५ टक्के मोफत प्रवेश देण्याचे बंधन खासगी शाळांना घालून दिले. दिव्यांग, मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा यामागील उदात्त हेतू आहे. या कायद्यान्वये खासगी नामांकित शाळेच्या पहिल्या वर्गात एकूण प्रवेशाच्या २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील मोफत प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला असून, पहिल्या टप्प्यात २१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी या दरम्यान शाळांनी नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर ११ ते २९ फेब्रुवारी या दरम्यान पालकांना पाल्याच्या प्रवेशासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत. शाळांची नोंदणी प्रक्रिया २१ जानेवारीपासून सुरू झालेली असताना, १३ दिवसात अमरावती विभागातील केवळ २१२ शाळांनी नोंदणी केली आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील तीन, बुलडाणा ११७, अमरावती १७, यवतमाळ ५५ आणि वाशिम जिल्ह्यातील २० शाळांचा समावेश आहे. शाळांची नोंदणी प्रक्रिया संथगतीने सुरू असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
आरटीई अंतर्गत खासगी शाळांना ६ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे. वाशिम जिल्ह्यातील शाळांनी विहित मुदतीच्या आत नोंदणी करावी, अशा सूचना दिलेल्या आहेत. विहित मुदतीपर्यंत बºयापैकी शाळांची नोंदणी होईल.
- अंबादास मानकर
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद वाशिम