आरटीओकडून खासगी बसेसवर कारवाई, २१६ बसेसची तपासणी: १.७२ लाखांचा दंड वसुल
By दादाराव गायकवाड | Published: October 18, 2022 07:42 PM2022-10-18T19:42:07+5:302022-10-18T19:42:13+5:30
जादा भाडे आकारल्यास बस चालक व मालकांवर कारवाई
वाशिम: जिल्ह्यात स्लिपर कोच बसेसची विशेष तपासणी मोहीम उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून राबविण्यात येत आहे. या तपासणीदरम्यान १७ ऑक्टोबरपर्यंत २१६ खाजगी बसेसची तपासणी करण्यात आली. ५९ खाजगी बसेसवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करून १ लक्ष ७२ हजार १०० रुपये दंड वसूल करण्यात आला. आरटीओने खासगी ट्रॅव्हल्ससाठी प्रवाशांकडून आकारण्यात येणारे प्रवासभाडे दरही निश्चित केले असून, प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून जादा भाडे आकारणीची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित खाजगी ट्रॅव्हल्सवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
आरटीओकडून खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानीला आणि प्रवाशांच्या होणाऱ्या पिळवणुकीला आवर घालण्यासाठी मोहीम राबविली जात आहे. यात अधिक भाडे आकारल्यास हेल्पलाईन क्रमांक ०२२६२२४२६६६, टोल फ्री क्रमांक १८००१२०८०४० किंवा डायट्रो३७-एमएच@गव्हडॉटइन या संकेतस्थळावर तक्रार करता येईल. बस वाहन रस्त्यावर चालवित असतांना तपासणी दरम्यान प्रवाशांकडून जादा भाडे आकारल्याचे दिसून आल्यास बसचे चालक व मालकांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल. २१ ऑक्टोबर ते ३१ऑक्टोबर या कालावधीत एसटी महामंडळाचे प्रवास भाडे दर १० टक्के अधिक आकारण्यात येत असल्याने खाजगी प्रवासी भाडे दरापेक्षा १० टक्के अधिक भाडे आकारण्याची खाजगी बस वाहतूकदारांना मुभा राहील, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी स्पष्ट केले आहे.
खासगी ट्रॅव्हल्ससाठी निश्चित केलेले दर
आरटीओने खाजगी ट्रॅव्हल्सकरिता निश्चित केलेल्या भाडे दरानुसार नॉन एसी निमआराम सिटर २.९४ रुपये प्रति कि.मी., एसी सिटर टाटा, अशोक लेलॅन्ड ३.२३ प्रति कि.मी. एसी सिटर व्होल्वो, मर्सिडीज, स्कॅनिया ४.८५ रुपये प्रति कि.मी., नॉनएसी स्लिपर २.९४ रुपये प्रति. कि.मी., एसी स्लिपर टाटा, अशोक लेलॅन्ड ३.७५ रुपये प्रति कि.मी. व एसी स्लिपर व्होल्वो, मर्सिडीज, स्कॅनिया ५.८० रुपये प्रति कि.मी. प्रवासभाडे असेल.