‘किडनॅपिंग’च्या टोळीची अफवा; नागरिक धास्तावले
By सुनील काकडे | Published: September 19, 2022 05:44 PM2022-09-19T17:44:59+5:302022-09-19T17:45:51+5:30
वाशिमातील काही शाळांकडून ‘सोशल मिडिया’वर प्रसारित झाले पत्र.
शहरात मुले पकडणारी (किडनॅपिंग) टोळी आल्याचे समजते. त्यामुळे पालकांनी पाल्ल्यांच्या बाबतीत सतर्क राहावे, अशा आशयाचे पत्र काही शाळांकडून आज, १९ सप्टेंबर रोजी ‘सोशल मिडीया’वर प्रसारित झाले. यामुळे मोठी खळबळ उडून नागरिक धास्तावले. मात्र, ही केवळ अफवा असून मुले पकडणारी कुठलीही टोळी जिल्ह्यात आढळलेली नाही, असे जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी स्पष्ट केले.
शाळेत शिक्षण घेणाऱ्या सर्वच मुलांचे पालक पाल्ल्यांच्या बाबतीत कुठलाही धोका पत्करू शकत नाही. अशा स्थितीत काही शाळांकडून आज मुख्याध्यापकांची सही, शिक्क्यानिशी पत्र प्रसारित करून वाशिम शहरात मुले पकडणारी टोळी आल्याचे समजते. त्यामुळे पालकांनी पाल्ल्यांच्या बाबतीत सतर्क राहावे. आपला पाल्य कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत जाणार नाही, याची खात्री करून घ्यावी. आपण पाल्ल्याच्या ऑटोचालकालाही ही सूचना द्यावी व आपल्या पाल्ल्यास शाळेतून नेण्याकरिता कोणत्याही अनोळखी व्यक्तीस पाठवू नये, अशी सूचना केली. हे पत्र ‘व्हाट्सॲप’वरील विविध ग्रुपवर झपाट्याने प्रसारित झाल्यामुळे मोठी खळबळ माजली. वाशिम शहरात खरोखरच मुले पकडणारी टोळी आली की काय, अशी भीती वर्तविण्यात येऊ लागली; मात्र ही केवळ अफवा असून असा प्रकार जिल्ह्यात कुठेही उघडकीस आलेला नाही, असे स्वत: जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी स्पष्ट केले.
मुले पकडणारी कुठलीही टोळी जिल्ह्यात आलेली नाही. असा कुठलाही प्रकार कुठेही घडलेला नाही. त्यामुळे ही केवळ अफवा असून शाळांच्या संचालकांनी अशा आशयाचे कुठलेही पत्र प्रसारित करण्यापूर्वी सारासार विचार करावा. नागरिकांनी मनात कुठलीही भीती बाळगू नये.
बच्चन सिंह,
जिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम