ग्रामीण भागातील कलावंतांना रंगमंच मिळायला हवा- यशवंत पद्मगीरवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 05:31 PM2019-12-07T17:31:31+5:302019-12-07T17:31:41+5:30
नाट्य परिषदेच्या शाखेचे प्रमुख कार्यवाह यशवंत देविदास पद्मगीरवार यांच्याशी यासंदर्भात साधलेला साधलेला हा संवाद...
वाशिम: ग्रामीण भागात अनेक अस्सल कलावंत दडलेले आहेत. त्यांना रंगमंच मिळाला तर ते पूर्ण दिमतीने स्वत:ला सिद्ध करू शकतील, त्यांना आपली कला सादर करता येईल. नाट्य परिषदेच्या रुपाने अशा कलावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. विविध सांस्कृतिक उपक्रम राबविणाऱ्या तथा नाट्य चळवळ जीवंत ठेवणाºया व ग्रामीण भागातील कलावंताना व्यासपीठ उपलब्ध करून देणाºया नाट्य परिषदेच्या शाखेचे प्रमुख कार्यवाह यशवंत देविदास पद्मगीरवार यांच्याशी यासंदर्भात साधलेला साधलेला हा संवाद...
आपण नाट्यक्षेत्रात कधीपासून कार्य करित आहात ?
- मी १९९२ पासून नाटयक्षेत्रात कार्य करीत आहे. बालपणापासूनच नाटक आवडायचे. गणपती उत्सवात त्यावेळी कलापथक, दंडार, नाटके व्हायची. तेंव्हाच आपणही नाटकात गेले पाहीजे असे मनोमन वाटायला लागले. माझे वडिल साहित्यीक होते. इलेक्ट्रॉनिक रिपेरिअरींगचा व्यवसाय करताना नाटकाला नैपथ्य, प्रकाश देण्याचे काम प्रथम केले. मानोरा तालुक्यातील सोमठाणा येथील काही ग्रामीण कलावंत नाटक करायचे, तेंव्हा अरविंद साखरकर यांच्या मार्गदर्शनात ह्यअमरज्योती ही बंधुत्वाचीह्ण या नाटकात प्रथम मी भुमिका केली. त्यानंतर विविध नाटक, चित्रपट, लघुपटांचे दिग्दर्शन व अभिनय देखील केला.
नाटपरिषदेशी कसे जुळलात?
ग्रामीण भागातील कलावंताना व्यासपीठ उपलब्ध करणे ही नाट्य परिषदेची भुमिका आहे. त्यामुळे आणपही शाखा स्थापन करावी, असे सुचले. त्यातूनच १९९६ मध्ये नाट्य परिषदेच्या शाखेची स्थापना केली. तेव्हा झालेल्या कार्यक्रमास प्रसिद्ध मराठी चिटपट अभिनेत्री अलका कुबल, मच्छींद्र कांबळी आले होते. तेंव्हापासून आजपर्यंत यामाध्यमातून विविध कार्यक्रम सुरू आहेत. २००९ मध्ये मराठी अभिनेते मोहन जोशी मानोरा येथे आले होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली नाट्य महोत्सव झाला. २०१२ मध्ये कलावंत मेळावा घेतला. त्यावेळी अभिनेता रमेश भाटकर आले होते. २०१३ मध्ये शाखेच्या वतीने मालेगाव येथे नाट्य महोत्सव घेतला, त्यावेळीही मोहन जोशी आले होते. २०१४ मध्ये मानोरा येथे विविध कला महोत्सव आयोजित केला होता. त्यासाठी मराठी अभिनेत्री ज्योती मिसळ, चारू देसले यांची उपस्थिती लाभली. आजही रंगभुमी दिन, नाटय, चित्रपट प्रशिक्षण शिबीर आदी उपक्रम राबविले जातात.
नाट्य चळवळ जिवंत ठेवण्यासाठी कुणाचे सहकार्य मिळाले ?
ग्रामीण भागातील कलावंताना रंगमंच मिळावा, यासाठी नाट्य परिषदेचे प्रयत्न सुरू आहेत. मोहन जोशी यांच्या प्रेरणेने व धनंजय रोठे, सज्जनप्रसाद दिक्षीत, सुभाष आरवडेवार, हरिचंद्र पोफळे, सुनील पडघान, माणिक डेरे, राजेंद्रसिंह राजपूत, श्रीभाउ कठाळे, आनंद खुळे, डॉ.पंडित राठोड, प्राचार्य प्रकाश कापुरे यांच्या सहकार्याने नाटयचळवळ जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक एकांकीका नाटक यांचे दिग्दर्शन करून भुमिका केली. वर्षभर विविध सांस्कृतिक कायक्रम राबवितो. त्यासाठी माझी पत्नी किरण हिची साथ लाभत आहे.