वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही गुंजतो वाघ्या-मुरळीचा आवाज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 03:15 PM2019-07-03T15:15:01+5:302019-07-03T15:15:10+5:30
गोंधळ घालणाऱ्या वाघ्या-मुरळीचा आवाज ग्रामीण भागात आजही गुंजत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : बदलत्या काळाच्या ओघात अनेक अस्सल लोककला लूप्त होण्याच्या मार्गावर आहेत; मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी काही कलावंतांनी प्राचीन काळापासून चालत आलेल्या प्राचीन कला आजही जीवंत ठेवल्या असून जागरण, गोंधळ घालणाऱ्या वाघ्या-मुरळीचा आवाज ग्रामीण भागात आजही गुंजत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मुळचे गुंज (ता.वसमत, जि.परभणी) येथील तथा गेल्या काही वर्षांपासून वाशिम शहरातील नंदीपेठमध्ये वास्तव्यास असलेले किसन विश्राम गुंजकर हे गावोगावी जावून जागरण आणि गोंधळाच्या कार्यक्रमांमधून समाजप्रबोधनाचे काम करित आहेत. विशेष म्हणजे त्यांचे वडिल शाहीर विश्राम रानोजी गुंजकर यांचे शिक्षण केवळ चौथीपर्यंत झाले असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तानाजी मालूसरे, पुरंदरचा वेढा, शाहिस्तेखानाची फजिती, प्रतापगडचा रणसंग्राम, गड आला पण सिंह गेला, संभाजी महाराजांचा रक्तरंजित इतिहास, शंभू शौर्य आदी विषयांवरील पोवाडेही किसन गुंजकर पहाडी आवाजात सादर करतात. याशिवाय गोंधळ आणि जागरणाचे कार्यक्रमही केले जात असल्याचे ते म्हणाले.
खंडोबाचे उपासक आहेत वाघ्या-मुरळी!
वाघ्या-मुरळी यांना खंडोबाचे उपासक म्हणून ओळखले जाते. अपत्यप्राप्तीसाठी किंवा मूल जन्माला येवूनही जगत नसेल, तर खंडोबाला नवस करणारे मातापिता ‘मला मूल होऊ दे, ते जगल्यास मी तुला अर्पण करीन’, असा नवस करायचे आणि अशा पद्धतीने नवसानंतर जन्मास आलेले मूल खंडोबाला अर्पण केले जायचे. मुलगा असल्यास त्याने वाघ्या; तर मुलगी असल्यास तीने मुरळी म्हणून संपूर्ण जीवन जगायचे, असा वाघ्या-मुरळीचा इतिहास असल्याची माहिती गुंजकर यांनी दिली. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात खंडोबाची एकूण ११ ठाणी असून तेथे लग्न, मुंजीनंतर वाघ्या-मुरळींकडून जागरण घातले जाते, असेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.