ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने थाटले हॉस्पिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 05:12 PM2019-05-19T17:12:24+5:302019-05-19T17:14:19+5:30

मालेगावच्या ग्रामीण रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकारी तथा प्रभारी वैद्यकीय अधिक्षकांनी मालेगाव शहरात चक्क स्वत:चे प्रशस्त हॉस्पिटल थाटून त्याठिकाणी रुग्ण तपासणी सुरू केल्याचे दिसून येत आहे.

Rural Hospital's Medical Officer run private hospital in malegaon | ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने थाटले हॉस्पिटल

ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने थाटले हॉस्पिटल

Next

- अरूण बळी 
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : शासनाकडून दरमाह पगार आणि ‘एनपीए’ (नॉन प्रॅक्टीस अलाऊन्स) घेणारे वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी स्वत:चा कुठलाही व्यवसाय अथवा इतर ठिकाणी नोकरी करू शकत नाहीत, असा नियम आहे; मात्र तो डावलून मालेगावच्या ग्रामीण रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकारी तथा प्रभारी वैद्यकीय अधिक्षकांनी मालेगाव शहरात चक्क स्वत:चे प्रशस्त हॉस्पिटल थाटून त्याठिकाणी रुग्ण तपासणी सुरू केल्याचे दिसून येत आहे. यामुळे मात्र त्यांचे मूळ शासकीय कर्तव्याकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा होत आहे. 
तालुका मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या मालेगावच्या ग्रामीण रुग्णालयाशी तालुक्यातील शेकडो गावे जोडलेली आहेत. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रथमोपचार करून रुग्ण ‘रेफर टू मालेगाव’ केले जातात. त्यामुळे रुग्णालयात रुग्णांची दैनंदिन मोठ्या प्रमाणात गर्दी असते. असे असताना रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. संदिप देवराव वाढवे यांनी अंगिकारलेल्या दुर्लक्षित धोरणामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून रुग्णालयाचा कारभार पूर्णत: ढेपाळला आहे. रुग्णांना मुलभूत सुविधा मिळणे दुरापास्त झाले आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण रुग्णालयात श्वानदंश लस, टायफाईडची अ‍ॅन्टीबायोटिक लस, खोकल्याची औषधी उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णालयात उपचार करायला येणाºया रुग्णांची तपासणी करून त्यांना बाहेरून औषधी विकत घ्यावी लागत असल्याचे सांगितले जात आहे. एकूणच विविध पातळ्यांवर मालेगावच्या ग्रामीण रुग्णालयाचा कारभार विस्कळित झाला आहे. 
दुसरीकडे शासनाकडून प्रतिमाह गलेलठ्ठ पगार घेत असतानाही वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदिप देवराव वाढवे यांनी शहरातच स्वत:चे प्रशस्त हॉस्पिटल थाटून त्याठिकाणी खासगीत रुग्ण तपासणीचा आणि त्यामाध्यमातून पैसे कमविण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे असे करित असताना डॉ. वाढवे हे मूळ कर्तव्याला कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत दांडी मारत आहेत. यामुळे त्यांचे रुग्णालयातील कार्यालय कुलूपबंद; तर स्वत:चे हॉस्पिटल सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. 
 
डॉ. वाढवे यांच्याकडून ‘एनपीए’चीही केली जाते उचल
बाहेर खासगीत हॉस्टिपल किंवा क्लिनिक थाटून रुग्ण तपासणी करित नसल्याच्या सबबीखाली डॉ. संदिप वाढवे हे शासनाकडून देय ‘एनपीए’ची (नॉन प्रॅक्टीस अलाऊन्स) देखील उचल करित आहेत, अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून प्राप्त झाली.
 
वैद्यकीय अधिकारी डॉ. संदिप वाढवे हे शासनाचा पगार आणि ‘एनपीए’ घेत असतील तर त्यांना स्वत:चे हॉस्पिटल थाटून रुग्ण तपासणी करताच येत नाही. हा पूर्णत: गैरप्रकार असून संबंधित वैद्यकीय अधिकाºयाची सखोल चौकशी केली जाईल. दोषी आढळल्यास निश्चितपणे ठोस कारवाई देखील करण्यात येईल.
- डॉ. अंबादास सोनटक्के
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम
 
माझे मालेगाव शहरात स्वत:चे हॉस्पिटल असले तरी मूळ शासकीय नोकरीलाच मी प्रथम प्राधान्य दिले आहे. रात्री-अपरात्री रुग्णालयात उपचाराकरिता येणाºया रुग्णांची विशेष काळजी घेण्यासाठी आपला नेहमीच पुढाकार असतो. माझ्या स्वत:च्या दवाखान्याची अडचण असल्यास आपण ‘एनपीए’ सोडायला तयार आहोत.
- डॉ. संदिप वाढवे
वैद्यकीय अधिकारी तथा प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, मालेगाव

Web Title: Rural Hospital's Medical Officer run private hospital in malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.