जलयुक्त शिवारच्या प्रलंबित कामांसाठी आटापिटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 04:02 PM2019-05-07T16:02:05+5:302019-05-07T16:02:20+5:30
वाशिम: पावसाळा तोंडावर आला असताना जलयुक्त शिवार अभियानांतर्गत प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी कृषी विभागाची धडपड सुरू झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: पावसाळा तोंडावर आला असताना जलयुक्त शिवार अभियानांतर्गत प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी कृषी विभागाची धडपड सुरू झाली आहे. त्यासाठी ई-निविदा पूर्ण करण्याची लगबग सुरू झाली असून, वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत प्रलंबित कामांचे बीओक्यू तयार करण्याच्या सुचना कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षकांना देण्यात आल्या आहेत.
कृषी विभागाच्यावतीने राबविल्या जाणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गतवर्षाच्या उद्दिष्टातील बहुतांश कामे प्रलंबित आहेत. पावसाळा महिनाभरावर येऊन ठेपला असताना ही कामे पूर्ण करणे आवश्यक झाले आहे. त्यात प्रामुख्याने ढाळीचे बांध आणि ई-क्लासवरील साठवण शेततळ्यांच्या कामाचा समावेश आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या आदेशान्वये सद कामांच्या ई-निविदा पूर्ण करावयाच्या आहेत. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयातील ज्यांची कामे शिल्लक आहेत (सुजलाम, सुफलामची कामे सोडून) अशा सर्व कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक यांनी त्या पूर्ण कामांचे टेंडर होईपर्यंत ऊपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात येऊन ढाळीचे बांध व ई-क्लास साठवण शेततळे या कामांचे तालुकानिहाय एकत्रित रुपये ५० लाखापर्यंत देयक बीओक्यू तयार करण्यासाठी उपस्थित राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.