जनसामान्यांसाठी ‘सबका साथ, सबका विकास’ संमेलन!
By admin | Published: July 8, 2017 01:48 AM2017-07-08T01:48:19+5:302017-07-08T01:48:19+5:30
उपमहाप्रबंधक देशपांडे यांची पत्रकार परिषदेत माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: विकासाची दृष्टी असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला तीन वर्षांचा कालावधी उलटला. या कार्यकाळात देशातील शेतकरी दलित, व सर्वसामान्य नागरिकांना विकासाच्या केंद्रस्थानी ठेवून विविध योजना राबविण्यात आल्या. केंद्र शासनाने राबविलेल्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने वाशिममध्ये शनिवार ८ जुलै रोजी सबका साथ, सबका विकास संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे उपस्थित राहणार असल्याची माहिती कोलफोल्ड लिमिटेडचे उपमहाप्रबंधक प्रभाकर देशपांडे यांनी आमदार राजेंद्र पाटणी यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्र परिषदेत दिली.
यावेळी आमदार राजेंद्र पाटणी, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे, उपमहाप्रबंधक ओ.पी. करोले देवेंद्रसिंह आदींची उपस्थिती होती. अधिक माहिती देताना देशपांडे म्हणाले की, गत तीन वर्षात केंद्र सरकारने अनेक साहसिक निर्णय घेऊन विकासकामांना गती दिली. गत तीन वर्षात एकही घोटाळा होऊ दिला नाही. पारदर्शक सरकार देऊन भ्रष्टाचार, काळे धन व दहशतवादाविरोधात धडक निर्णय घेतल्याचे सांगितले.
जीएसटी, मेक इन इंडिया, कॅशलेस व्यवहार, डिजिटल व्यवहार आदी निर्णय घेऊन देशाला नवीन दिशा देण्याच्या प्रयत्न मोदी सरकारद्वारे करण्यात येत आहे. समृद्ध भारतासाठी तसेच शेतकऱ्यांना संपन्न करण्यासाठी विविध योजना अमलात आणण्यात आल्या. या संदर्भात लेखाजोखा मांडण्यासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे शनिवार ८ जुलै रोजी वाशिम येथे येणार आहेत. या कार्यक्रमाला राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, पाकलमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार लखन मलिक, आमदार अमित झनक, नगराध्यक्ष अशोक हेडा, उपाध्यक्ष बंटी वाघमारे, यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार राजेंद्र पाटणी यांनी केले आहे.