प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी सफाई कामगारांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 07:50 PM2017-10-13T19:50:44+5:302017-10-13T19:51:47+5:30
कारंजा नगर परिषदेतील सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्या तसेच पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम दिवाळी अगोदर मिळावी, या मागण्यांसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर कॉग्रेस शाखा कारंजाच्यावतीने तहसिल कार्यालयावर १३ आॅक्टोबर रोजी मोर्चा काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड - कारंजा नगर परिषदेतील सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्या तसेच पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम दिवाळी अगोदर मिळावी, या मागण्यांसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर कॉग्रेस शाखा कारंजाच्यावतीने तहसिल कार्यालयावर १३ आॅक्टोबर रोजी मोर्चा काढला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी कारंजा येथील सफाई कामगारांनी ९ आॅक्टोबरपासून स्थानिक नगर कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन केले. परंतु संबंधितांनी दखल न घेतल्याने १३ आॅक्टोंबर रोजी कारंजा तहसिल कार्यालयावर झाडू मोर्चा काढून प्रलंबित मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांना देण्यात आले. मागण्यांची पुर्तता न झाल्याने सफाई कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले असून, दिवाळीपुर्वी थकीत रक्कम देवून तसेच प्रलंबित मागण्या मांन्य करून दिवाळी गोड करावी अशी मागणी सफाई कामगार संघटनेने केली. कारंजा नगर परिषद कार्यालयापासून निघालेल्या या झाडू मोर्चात अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते.