शिरपुरात संत सावतामाळीचा जयघोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 05:01 PM2019-07-31T17:01:53+5:302019-07-31T17:01:58+5:30
शिरपूर जैन (वाशिम) : येथील संत सावता माळी संस्थानच्यावतीने आयोजित संत सावता माळी पुण्यतिथीचा समारोप बुधवार ३१ जुलै रोजी करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम) : येथील संत सावता माळी संस्थानच्यावतीने आयोजित संत सावता माळी पुण्यतिथीचा समारोप बुधवार ३१ जुलै रोजी करण्यात आला. यानिमित्त गावातून संत सावता माळी यांच्या पालखीची शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी संत सावता माळी यांच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला होता. शोभायात्रेनंतर भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. हजारो भाविकांनी त्याचा लाभ घेतला.
शिरपूर जैन येथील संत सावता माळी संस्थानच्यावतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही संत सावता माळी पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त संस्थानमध्ये आठवडाभर श्रीमद् भागवत कथा वाचनासह किर्तन, प्रवचन, प्रबोधन असे विविध कार्यक्रम पार पडले. ३१ जुलै हा संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीचा दिवस होता. तयामुळे गावामध्ये संत सावतामाळी यांच्या पालखीची शोभायात्रा काढण्यात आली. या पालखी शोभायात्रेमध्ये हजारो माळी समाज बांधव सहभागी झाले होते. ठिक ठिकाणी संत सावता माळी यांच्या पालखीचे स्वागत व पुजन भाविकांच्यावतीने करण्यात आले. पालखीमध्ये बालगोपालांनी लेझिमचे प्रात्यक्षिक दाखविले, तर वयोवृद्ध भाविकांनी भजने सादर केली.पालखीतील भाविकांसाठी महात्मा फुले वेटाळ, ईरतरकर वेटाळासह सेवानिवृत्त शिक्षक तुळशीराम जाधव यांच्याकडून चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मिरवणुकीनंतर संत जानगीर महाराज संस्थान मध्ये महाप्रसाद वितरण करण्यात आले. या महाप्रसादासाठी २५ क्विंटलच्या पोळ्या, ११ क्विंटल काशी फळाची भाजी व २ क्विंटल रव्याचा शिरा तयार करण्यात आला होता. या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला.
युवकांनी काढली दुचाकी रॅली
संत सावता माळी यांच्या पुण्यतथीनिमित्त शिरपूर येथे युवकांनी दुचाकी रॅलीही काढण्यात आली होती. सकाळी ९ वाजता माळी युवा संघाच्यावतीने गावातून ही दुचाकी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत ही मोठ्या प्रमाणात माळी युवकांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी माळी समाजातील युवकांनी परिश्रम घेतले. संत सावता माळी यांचा जयघोष करीत ही रॅली शिस्तबद्ध पद्धतीने गावातील मुख्य रस्त्यावरून फिरविण्यात आली.