आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांचे वेतन तीन महिन्यांपासून थकले
By admin | Published: June 1, 2017 08:09 PM2017-06-01T20:09:57+5:302017-06-01T20:21:35+5:30
आर्थिक अडचणी: समाज कल्याण विभागाच्या दखलीची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: मालेगाव तालुक्यातील मुसळवाडी येथील आश्रम शाळेवर कार्यरत ३० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचे वेतन मागील चार महिन्यांपासून थकले आहे. त्यामुळे हे कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले असून, त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची पाळी आली आहे.
मुसळवाडी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमीक आश्रम शाळेत शिक्षक व शिक्षकेत्तर मिळून जवळपास ३० पेक्षा अधिक नियमित क र्मचारी कार्यरत आहेत. . शासनाच्या नियमानुसार तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या १ तारखेला बँक खात्यावर जमा होणे बंधनकारक आहे; परंतु या आदेशाला बगल देऊन मुसळवाडी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांना फेबु्रवारी, मार्च, एप्रिल, अशा तीन महिन्यांचे वेतन थकविण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. अनेक कर्मचाऱ्याना गृहकर्ज, विमा हप्ते, मुलांचे शैक्षणिक शुल्क कसे भरावे आणि वैद्यकीय उपचाराचा खर्च कसा करावा, असे प्रश्न सतावत आहेत. विशेष म्हणजे अमरावती आदिवासी विभागांतर्गत अनेक आश्रम शाळा कार्यरत असून त्यापैकी बहुतांश शाळातील कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित होत असताना मुसळवाडी, आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यापासून वेतनाकरिता कार्यालयाकडून चौकशी करुन कर्मचाऱ्यांना आर्थिक विंवचनेपासून दिलासा द्यावा अशी विधायक मागणी कर्मचारी वर्गाकडून होत आहे.