कागदपत्रांची पुर्तता न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन रोखले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:46 AM2021-08-12T04:46:06+5:302021-08-12T04:46:06+5:30
‘एनएचएम’अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक आरोग्य अधिकारी, कर्मचारी हे कंत्राट तत्त्वावर कार्यरत आहेत. काही जणांचा करार संपुष्टात आलेला ...
‘एनएचएम’अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक आरोग्य अधिकारी, कर्मचारी हे कंत्राट तत्त्वावर कार्यरत आहेत. काही जणांचा करार संपुष्टात आलेला आहे. करार पुनरुज्जीवित होण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असताना, याकडे अनेक अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले. कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांना वारंवार सूचना देण्यात आल्या. प्रशासकीय कामात दिरंगाई करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशाराही देण्यात आला. तरीदेखील अनेकांनी कागदपत्रे सादर केली नाहीत. शेवटी नाइलाजास्तव कागदपत्रे सादर न करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्यात आले आहे. वेतन होण्यासाठी कागदपत्रे सादर करा, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या.
०००
‘बॉन्ड’ची कार्यवाही पूर्ण होण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावी, अशा सूचना राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत. या उपरही अनेकांनी कागदपत्रे सादर केली नाहीत. कागदपत्रे सादर न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविले आहे. इतर कर्मचाऱ्यांचे वेतन झाले आहे. कागदपत्रे सादर न केलेल्या कर्मचाऱ्यांनी वेतन सुरळीत होण्यासाठी कागदपत्रे सादर करावी.
- ससे
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक
राष्ट्रीय आरोग्य अभियान, वाशिम