तीनच दिवसात २०० मे.टन युरियाची विक्री; युरियासाठी शेतकऱ्यांची झुंबड
By संतोष वानखडे | Published: August 9, 2023 04:46 PM2023-08-09T16:46:11+5:302023-08-09T16:47:32+5:30
पिकांच्या वाढीनुसार शेतकरी हे संबंधित खत, युरिया पिकांना देतात. त्यामुळे कोणत्याही खताचा तुटवडा निर्माण झाला तर त्याची झळ शेतकऱ्यांना बसते.
वाशिम : दीर्घ प्रतिक्षेनंतर रविवारी (दि.६) सायंकाळनंतर रिसोड तालुक्यात २०० मेट्रीक टन युरिया प्राप्त झाला होता. बुधवारी (दि.९) दुपारी २ वाजेपर्यंत युरिया संपल्याने, तीन दिवसांत तब्बल २०० मे.टन युरियाची विक्री झाली.
खरीप हंगामात खतांचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून कृषी विभागाने पूर्वनियोजन करणे शेतकऱ्यांना अपेक्षीत असते. पिकांच्या वाढीनुसार शेतकरी हे संबंधित खत, युरिया पिकांना देतात. त्यामुळे कोणत्याही खताचा तुटवडा निर्माण झाला तर त्याची झळ शेतकऱ्यांना बसते. ऐन सोयाबीन बहरण्याचा हंगामात मध्यंतरी रिसोड तालुक्यात युरियाचा साठा नसल्याने शेतकरी सैरावैरा झाल्याचे पाहावयास मिळाले होते. वारंवार मागणी झाल्यानंतरही २ ते ५ ऑगस्टदरम्यान रिसोड तालुक्यात युरिया उपलब्ध झाला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांना चार दिवस वाट बघावी लागली.
६ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास रिसोड शहरातील सहा कृषी सेवा केंद्र आणि केनवड, कवठा व मांगूळ झनक येथील प्रत्येकी एक असे एकूण नऊ कृषी सेवा केंद्राला २०० मे.टन युरियाचा साठा उपलब्ध करून देण्यात आला. युरिया प्राप्त झाल्याची माहिती मिळताच, शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रावर एकच गर्दी केली. रिसोड शहरात तर सकाळी ७ वाजतापासूनच कृषी सेवा केंद्रासमोर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्याचे चित्र गत तीन दिवस पाहावयास मिळाले. बुधवारी दुपारी २ वाजेपर्यंत २०० मे.टन युरिया संपला. त्यामुळे उर्वरीत शेतकऱ्यांना आता युरियाची प्रतीक्षाच करावी लागणार आहे.