प्लास्टिकपासून बनलेल्या राष्ट्रध्वजाची विक्री, वापरास सक्त मनाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 02:14 PM2019-08-07T14:14:59+5:302019-08-07T14:15:05+5:30
प्लास्टिकपासून बनलेले लहान राष्ट्रध्वज यांची विक्री व वापर करू नये, अन्यथा संबंधितांविरूद्ध कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने बुधवारी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : स्वातंत्र्य दिन अर्थात १५ आॅगस्ट रोजी विद्यार्थी, लहान मुले, व्यक्ती राष्ट्रभक्ती व उत्साहापोटी लहान आकारातील कागदी किंवा प्लास्टिकपासून बनलेले राष्ट्रध्वज खरेदी करतात. त्याच दिवशी सायंकाळी किंवा दुसऱ्या दिवशी हे ध्वज इतस्तत: टाकले जातात. राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्यासाठी प्लास्टिकपासून बनलेले लहान राष्ट्रध्वज यांची विक्री व वापर करू नये, अन्यथा संबंधितांविरूद्ध कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने बुधवारी दिला.
राष्ट्रध्वजाचा आदर करणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान व विटंबना करणे हा दंडनीय अपराध आहे. वापरास उपयुक्त नसलेले, फाटलेले व जीर्ण, खराब झालेले किंवा रस्त्यावर, मैदानावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तालुका स्तरावर तहसीदार कार्यालय व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द करावेत. यासाठी सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय व निमशासकीय कार्यालये, स्वयंसेवी संस्था, पालक व सर्वसामान्य नागरिकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. ज्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करावयाचे आहे, त्यांनी सकाळी ८.३५ वाजेपुर्वी किंवा सकाळी ९.३५ वाजेनंतर ध्वजारोहण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले.