वेतनास विलंब; शिक्षकांना बसतोय व्याजाचा भुर्दंड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 05:38 PM2018-09-24T17:38:49+5:302018-09-24T17:39:28+5:30

५ महिन्यांपासून शिक्षकांचे वेतन विलंबाने होत असून, घरबांधकामासह इतर आवश्यक गरजांसाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते थकत असल्याने संबंधित शिक्षकांना अतिरिक्त व्याजाचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

Sallary delay; teachers suffers in washim district | वेतनास विलंब; शिक्षकांना बसतोय व्याजाचा भुर्दंड!

वेतनास विलंब; शिक्षकांना बसतोय व्याजाचा भुर्दंड!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शिक्षकांचे वेतन दरमहा ५ तारखेच्या आत अदा करावे, अशा स्पष्ट सुचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिल्या आहेत. मात्र, गेल्या ५ महिन्यांपासून शिक्षकांचे वेतन विलंबाने होत असून, घरबांधकामासह इतर आवश्यक गरजांसाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते थकत असल्याने संबंधित शिक्षकांना अतिरिक्त व्याजाचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत ग्रामीण भागातील शाळांमध्ये सुमारे ३५०० शिक्षक कार्यरत आहेत. त्यातील बहुतांश शिक्षकांनी घर बांधकाम, वाहन यासह अन्य कारणांसाठी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेसह इतर बँकांकडून कर्ज घेतलेले आहे. त्याचे हप्ते महिन्याच्या ५ ते ७ तारखेपर्यंत जमा करावे लागतात; अन्यथा कर्जावर अतिरिक्त व्याज भरावे लागते. असे असताना जिल्ह्यातील काही पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाºयांकडून जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाकडे दर महिन्यात पगार मागणी प्रस्ताव पाठविण्यास विलंब लागत असल्याने पगार ५ तारखेऐवजी विलंबाने होत असल्याचे अन्यायग्रस्त शिक्षकांचे म्हणणे आहे. याप्रकरणी न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा पवित्रा अंगिकारावा लागेन, असा संतप्त सूरही शिक्षकांमधून उमटत आहे.


प्राथमिक शिक्षकांच्या वेतनास दर महिन्यात विलंब होत आहे. यामुळे त्यांना कर्जावरील व्याजाचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत असून अन्य स्वरूपातील अडचणीही जाणवत आहेत. ही समस्या तत्काळ निकाली काढून वेतन महिन्याच्या ५ तारखेपर्यंत अदा करावे; अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही.
- विजय मनवर
जिल्हा सरचिटणीस, अ.भा. शिक्षक संघ, वाशिम


वाशिम पंचायत समिती स्तरावरून पगार मागणी प्रस्ताव वेळेतच सादर केले जातात. मात्र, जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात जोपर्यंत जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे अहवाल मिळत नाहीत, तोपर्यंत पगाराची रक्कम दिली जात नाही. त्यामुळेच दर महिन्यात शिक्षकांचे पगार करण्यास विलंब लागतो. रक्कम प्राप्त झाल्यानंतर मात्र तत्काळ पगार जमा केले जातात.
- गजानन बाजड
गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, वाशिम

Web Title: Sallary delay; teachers suffers in washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.