इंझोरी परिसरातील पाणंद रस्त्यांच्या कामाला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:35 AM2021-02-08T04:35:32+5:302021-02-08T04:35:32+5:30
इंझोरी: परिसरातील पाणंद रस्त्यांची अवस्था बिकट असल्याने शेती वहिती करणे शेतकºयांसाठी कठीण झाले आहे. ही समस्या लक्षात घेत ...
इंझोरी: परिसरातील पाणंद रस्त्यांची अवस्था बिकट असल्याने शेती वहिती करणे शेतकºयांसाठी कठीण झाले आहे. ही समस्या लक्षात घेत जि.प. सदस्य विनादेवी जयस्वाल यांनी आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामार्फत शासनाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे परिसरातील २४ पाणंद रस्त्यांच्या कामांना पालकमंत्री पाणंद रस्ता योजनेतून मंजुरी मिळाली आहे.
कुठल्याही शेतकऱ्यासाठी आणि कोणत्याही शिवारात वहिवाटीसाठी अतिशय महत्त्वाचा असतो तो पाणंद रस्ता. हा रस्ता चांगला नसला तर शेतीच्या कामांवर परिणाम होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होते. इंझोरी परिसरातील शेतकऱ्यांना याच समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यात पावसाळ्याच्या दिवसांत, तर या रस्त्यांवर चिखल तयार होऊन दलदलसदृश स्थिती निर्माण होते. त्यामुळे गुडघाभर चिखलातून शेतकºयांना शेतात साहित्याचे नेआण करावी लागते. लोकमतने या संदर्भात वृत्त प्रकाशित करून प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले. त्याची दखल घेत जि. प. सदस्य विनादेवी अजय जयस्वाल यांनी आमदार राजेंद्र पाटणी यांच्याकडे मागणी केल्याने पाटणी यांनी शासनाचे पालकमंत्री योजनेतून परिसरातील २४ या पाणंद रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे इंझोरी, अजनी, उंबर्डा लहान, म्हसणी, जामदरा, घोटी, दापुरा (खु), दापुरा ( बू), धानोरा भुसे, चौसाळा, मोहगव्हान, भोयणी, पारधी तांडा, चोंढी, पारवा आदी गावांतील पाणंद रस्ते आता मोकळा श्वास घेणार असून, शेतकऱ्यांची वहिवाट सुरळीत होणार आहे.
इंझोरी येथून उंबर्डा लहान गावाकडील शेतशिवारात जाण्यासाठी असलेल्या पाणंद रस्त्यावर सततच्या पावसामुळे दलदल तयार होते, शिवाय इतर दिवसांत माती निघून दगड उघडे पडतात. त्यामुळे शेती वहिवाट कठीण होते. याच रस्त्यावर शेकडो शेतकऱ्यांची शेती आहे. आता या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून, हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, अशी मागणी आहे.
-गजानन लाहोरे,
शेतकरी, उंबर्डा
गावातील स्मशानभूमीपासून पुढे घोटीकडील शिवारात जाण्यासाठी असलेल्या जुन्या शेतरस्त्यावर केवळ चिखलच चिखल साचतो. त्यामुळे वाहने नेणे अशक्यच होऊन शेतीकामे खोळंबतात आणि आम्हाला नुकसान सहन करावे लागते. आता. या रस्त्याच्या कामाला पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेतून मंजुरी मिळाल्यामुळे आमची समस्या दूर होईल; परंतु हे काम तातडीने पूर्ण करावे.
-सुनीता मोरकर शेतकरी, इंझोरी