वाळू उपशामुळे अरुणावती नदीचे अस्तित्व धोक्यात; गावालाही धाेका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 03:42 PM2020-12-08T15:42:47+5:302020-12-08T15:45:49+5:30
Washim News जिल्ह्यात अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
मानाेरा : मानोरा शहरापासून केवळ सात किलोमीटर अंतरावर असलेल्या कारखेडा या एकाच गावातील अरुणावती नदी आणि खोराडी नाल्यांमध्ये दररोज जवळपास पाच ते दहा ट्रॅक्टरद्वारा अवैध वाळूचे उत्खनन मागील अनेक वर्षांपासून राजरोसपणे सुरु असल्याने नदीचे अस्तित्व तर धाेक्यात आलेच आहे शिवाय याचा गावालाही धाेका निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात बऱ्याच वर्षांपासून वाळू घाटांचा लिलाव झालेला नाही. यामुळे अवैध वाळू तस्करीला उधाण आले आहे. मानाेरा तालुक्यातील कारखेडा येथील अरुणावती नदीमधील रेती उत्खनामुळे माेठया प्रमाणात रुंदी वाढली असून जागाेजागी ५ ते ६ फूट रेती उत्खननाने खड्डे झाले आहेत. जिल्हयातील रेती उत्खनन थांबावे याकरिता तालुकास्तरावर पथके सुध्दा नेमण्यात आले आहेत. या पथकाव्दारे माेठया प्रमाणात कारवाई सुरु असली तरी अवैध रेती उत्खनन सुरुच असल्याचे दिसून येत आहे.
पात्र रूंदावल्याचा गावाला, शेतीला फटका
अवैध वाळू उपसा हाेत असल्याने पर्यावरणाला धाेका निर्माण झाला आहेच, शिवाय भविष्यात अरुणावती नदी नजिक कारखेडा गावाला तसेच परिसरातील शेतीला याचा धाेका हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. अवैध वाळू उपसा थांबविण्यासाठी तालुकास्तरावा समिती स्थापन असून यांनी याकडे लक्षदेणे गरजेचे आहे.
दररोज ८ ते १० ट्रॅक्टरचा हाेताेय वाळू उपसा
कारखेडा या गावातून दररोज जवळपास पाच ते दहा ब्रास रेती उत्खनन आणि बेकायदेशीर विक्री होत असून खोराडी नाला आणि अरुणावती नदीच्या पात्राची चाळण हाेत आहे. गौण खनिज माफियांनी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या नाकावर टिच्चून अवैध वाळू उपसा करीत असल्याचे चित्र कारखेडा परिसरातून दिसून येत आहे.
वाळूघाटाचे लिलाव न झाल्याने जिल्ह्यात प्रशासन नियंत्रणबाह्य अवैधरित्या वाळूची चोरी सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या पर्यावरण आघात मूल्यांकन निश्चित करण्यासाठी जिल्हा सर्व्हेक्षण अहवाल तयार करणे गरजेचे आहे
- ॲड. श्रीकृष्ण राठाेड,
पर्यावरण तज्ज्ञ, मानाेरा